इंग्लंडमध्ये जनुकीय फेरफार केलेले टोमॅटो | पुढारी

इंग्लंडमध्ये जनुकीय फेरफार केलेले टोमॅटो

लंडन : एके काळी विषारी फळ मानल्या जाणार्‍या टोमॅटोला आता जगभरातील लोकांच्या आहारात स्थान मिळालेले आहे. सध्या अशा काही फळभाज्यांना जनुकीय सुधारणा करून अधिक पौष्टिक बनवले जात आहे. आता इंग्लंडमध्ये टोमॅटोमध्येही अशाच जनुकीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाचा स्तर वाढवणार्‍या अशा टोमॅटोची तिथे लवकरच विक्रीही सुरू होईल.

नॉर्विच येथील संशोधकांनी या जनुकीय सुधारित टोमॅटोचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटोमधील जेनेटिक कोडमधील एका विशिष्ट मॉलेक्यूलला रोखून हे नवी पीक घेतले जात आहे. इंग्लंडमध्ये अशा जनुकीय सुधारित पिकांच्या व्यावसायिक उत्पादनाला परवानगी देण्यासाठी एक विधेयक आणले जाणार आहे. सध्या युरोपियन महासंघाच्या नियमांनुसार तिथे असे तंत्रज्ञान वापरले जात नाही. मात्र, आता ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडला असल्याने या ‘ब्रक्झिट’मुळे ही संधी इंग्लंडला मिळालेली आहे. इंग्लंडमधील सहापैकी एका माणसामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. हाडे व स्नायू बळकट करण्यासाठी तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजाराला दूर ठेवण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व गरजेचे असते. आता त्याची पूर्तता असे नवे टोमॅटो करू शकतात. जॉन इन्स सेंटरमधील प्रा. कॅथी मार्टिन यांनी याबाबतची माहिती दिली असून ती ‘नेचर प्लँटस्’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button