वीज पडण्याच्या पंधरा मिनटापूर्वी अलर्ट करणारे अॅप ; डाऊनलोड करण्याचे आवाहन | पुढारी

वीज पडण्याच्या पंधरा मिनटापूर्वी अलर्ट करणारे अॅप ; डाऊनलोड करण्याचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनच्या कालावधीत वीज पडून जीवितहानी होऊ नये यासाठी भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. हे ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा आणि संबंधितांनी ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे. या ॲपच्या मदतीने वीज पडत असल्याची सूचना काही मिनिट आधी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मान्सूनच्या कालावधीत जून व जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना घडतात. वीज पडून जीवित हानी होऊ नये यासाठी भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एक ॲप तयार केले असून हे ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय यंत्रणेतील संबंधितांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हे ॲप जीपीएस लोकेशन ने काम करणार असून वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सदर ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येणार आहे. त्यामुळे ॲप मध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास सदरच्या ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होणार आहे. या कालावधीत कोणत्याही झाडाच्या आश्रयाला थांबू नये, याबाबत संबंधितांना आणि नागरिकांना निर्देश देणे शक्‍य होणार आहे. तसेच इतर नागरिकांनी देखील हे डाउनलोड करण्यास शासकीय यंत्रणेने प्रवृत्त करावे असे आदेश देण्यात आले आहे.

या ॲपच्या वापरासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून दामिनी ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करणे आणि वापरणे याबाबतही माहिती द्यावी व यासंदर्भातला अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश धुळ्याचे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, अप्पर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. विशेषता शासकीय यंत्रणेतील शासकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाऊनलोड करून करण्यासंदर्भातील माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button