फुकटात ‘चार्जिंग; जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी विजेचा गैरवापर | पुढारी

फुकटात ‘चार्जिंग; जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी विजेचा गैरवापर

पुणे : दुपारी चारची वेळ… ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय… चारही बाजूंनी सुरक्षारक्षकांचा पहारा… तरीही पार्किंगमध्ये राजरोसपणे फुकटात चार्जिंग करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजेच्या महागाईच्या झळा बसत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘फुकटात चार्जिंग’ करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अधिकारी, कर्मचारी आणि इतर कामांनिमित्त येणार्‍या नागरिकांसाठी वाहनतळ उभारण्यात आले. आता हेच वाहनतळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी बेकायदा चार्जिंग स्टेशन बनले आहे. खुलेआम विना परवाना चार्जिंगसाठी विजेचा वापर केला जात आहे. एकीकडे शेतकर्‍यांना विजेसाठी वणवण करावी लागत आहे. वीज वापरणे सर्वसामान्य माणसालाही परवडत नाही. प्रशासकीय कार्यालय मात्र वीजचोरीची कुरणे बनत असल्याचे दिसून येत आहे.

फुकटात करा पार्किंग… राहा बिनधास्त !

जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या नागरिक, अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी वाहनतळ आहे. त्यामुळे वाहनधारकांची सोय होत असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याचा फायदा घेत अनेकजण आपली वाहने उभे करून बाहेरगावी जाऊन येतात. तोपर्यंत वाहने सुरक्षित असतात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहनतळात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले नाही, तशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. जर कोणी अशाप्रकारे विजेचा दुरुपयोग करीत असेल, तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
                                                – हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.

हेही वाचा

 

Back to top button