दुहेरी खुनामुळे धुळे जिल्हा हादरला, माय-लेकीची धारदार शस्त्राने हत्या | पुढारी

दुहेरी खुनामुळे धुळे जिल्हा हादरला, माय-लेकीची धारदार शस्त्राने हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील तरवाडे शिवारात धुळे सोलापूर महामार्ग लगत अल्पोपहारचे हॉटेल चालवणाऱ्या माय लेकीचा डोक्यात धारदार शस्त्र टाकून खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्हा हादरला असून पोलीस पथकाने तातडीने मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पथके गठीत केली आहे.

धुळे तालुक्यातील तरवाडे गावात राहणाऱ्या चंद्रभागा भाऊराव महाजन वय 65 यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. चंद्रभागाबाई या मुलांपासून विभक्त राहत होत्या. तरवाडे शिवारात धुळे सोलापूर मार्गावर एका पत्रटी शेडमध्ये अल्पोपहाराची हॉटेल टाकून त्या हॉटेल मधल्या एका भागातच वास्तव्यास होत्या. त्यांची मुलगी वंदनाबाई गुणवंत महाले वय ४५ ही जळगाव जिल्ह्यातील आडगाव येथे राहते. तिला देखील दोन मुले आणि एक मुलगी असून गेल्या तीन महिन्यांपासून घरात कौटुंबिक कलह झाल्यामुळे वंदनाबाई या आई जवळ राहण्यासाठी आलेल्या होत्या. या दोन्ही मायलेकी अल्पोपहाराचा हॉटेलच्या एका भागातच वास्तव्यात होते.

आज सकाळी चंद्रभागाबाई यांचा नातू दूध घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला असता त्यांना या दोघींचा मृतदेह खाटेवर दिसून आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती इतर नागरिकांना दिली. दरम्यान ही माहिती कळाल्याने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सागर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, प्रकाश पाटील हे श्वान पथकासह घटनास्थळी पोहोचले. या दोनही मयत महिलांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याची बाब निदर्शनास आल्याने त्यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली. घटनास्थळावर श्वान पथकाला संशयित वस्तूंचा गंध दिला. मात्र या पथकाला मारेकऱ्यांचा माग काढण्यात यश आले नाही. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी चंद्रभागाबाई यांच्या मुलाने काही संशयित नावे सांगितली असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान एकाच वेळी मायलेकीची अशा पद्धतीने हत्या झाल्यामुळे धुळे जिल्हा या घटनेमुळे हादरला आहे.

हेही वाचा :

Back to top button