नाशिक : पीएच. डी.साठी सामायिक प्रवेशपरीक्षा प्रक्रिया; अर्जासाठी 31 मेपर्यंत डेडलाइन | पुढारी

नाशिक : पीएच. डी.साठी सामायिक प्रवेशपरीक्षा प्रक्रिया; अर्जासाठी 31 मेपर्यंत डेडलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2022-2023 करिता पीएच.डी. अभ्यासक्रम प्रवेशाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश अर्जासाठीची अंतिम मुदत दि. 31 मेपर्यंत असेल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

आरोग्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमार्फत पीएच.डी. अभ्यासक्रम व सामायिक प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेशासाठी आरोग्य विद्यापीठाने अर्ज मागविले आहेत. आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. आरोग्य शिक्षणात संशोधनाकरिता मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी व अभ्यागत यांची पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेशाकरिता सामायिक प्रवेशपरीक्षा घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शक शिक्षकांकडे प्रवेशित असलेले विद्यार्थी व संशोधन केंद्रातील विद्यार्थी यांना प्रवेशप्रक्रिया परीक्षेनंतर विहित पद्धतीने प्रवेश दिला जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. विद्यापीठाचे www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना क्रमांक 18/2022 मध्ये माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी व अभ्यागतांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पीएच.डी. अभ्यासक्रमासंदर्भात शैक्षणिक पात्रता, नोंदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरूप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती देण्यात आली आहे. पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया, परीक्षा व आनुषंगिक माहितीसाठी पालक, विद्यार्थी व अभ्यागतांनी 0253-2539196 किंवा 2539206 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा :

Back to top button