नाशिक : चेन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी पोलिसांच्या रडारवर | पुढारी

नाशिक : चेन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक चोरट्यांसह इराणी टोळीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. चेन स्नॅचिंगची पद्धत बघता इराणी टोळीवर जास्त संशय असून, या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी परजिल्ह्यासह परराज्यात पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी काळात इराणी टोळीच रडारवर राहणार असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त वसंत मोरे आदी उपस्थित होते. चेन स्नॅचिंगच्या घटना पोलिसांनी परिसरातील व्हिडिओ फुटेज तपासून गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असून, त्यात संशयित हे इराणी टोळीचे सदस्य असल्याचे आढळून आले आहे. काही घटनांमध्ये स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग नाकाराता येत नसल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले. चेन स्नॅचिंग करणार्‍या इराणी टोळीचा आंतरजिल्ह्यासह आंतरराज्य टोळीशी संबंध आहे. विशेषतः कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यात अनेक गुन्हे करून संशयित फरार होतात. या संशयिताची सध्या ओळख पटली असून, त्यांची नावेही माहिती झाली आहेत. पोलिस इराणी टोळीच्या मागावर आहे. या टोळीच्या सदस्यांना जेरबंद करण्यासाठी संबंधित स्थानिक पोलिस प्रशासनासोबत बोलणे झाल्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.

पोलिस उतरले रस्त्यावर – चेन स्नॅचिंगसह इतर गैरप्रकार रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. या नाकाबंदीत अद्यापही एकही गुन्हा आढळून न आल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. त्यामुळे नाकाबंदी केवळ फार्स ठरत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

Back to top button