शेतकर्‍याने गायीच्या स्मरणार्थ उभारले मंदिर, पहा कुठे ते… | पुढारी

शेतकर्‍याने गायीच्या स्मरणार्थ उभारले मंदिर, पहा कुठे ते...

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील अंतापूर येथे पाळीव गायीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मरणार्थ ह.भ.प. रावण अहिरे या शेतकर्‍याने शेतात चक्क गोमातेचे मंदिर उभारले आहे.

हिंदू धर्मात गायीला धार्मिकद़ृष्ट्या मोठे महत्त्व आहे. त्याचबरोबर आयुर्वेदाच्या द़ृष्टीनेही गायीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ यांना तितेकचे महत्त्व आहे. गायीपासून मिळणारे शेण, गोमूत्र याचाही सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ‘ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी लक्ष्मीचे पाय’, या विधानावर लोकांची अत्यंत श्रद्धा आहे. त्यातूनच बागलाण तालुक्यात अंतापूर या गावात चक्क गायीचे मंदिर उभारले आहे. शक्यतो गायीचे मंदिर कुठे आढळत नसून, ते महाराष्ट्रात एकमेव असेल, असा दावा केला जात आहे.

अंतापूर येथील ह.भ.प. रावण झिंगू अहिरे यांच्या नळबारी शिवारातील शेतात पाळलेली गाय वार्धक्याने गुरुपौर्णिमेच्या दिवशी मरण पावली.शेतातील घरासमोर तिची विधिवत सतीगती केली. नाथपंथी असलेल्या रावणदादांना गायीच्या आठवणीसाठी मंदिर असावे, ही इच्छा मुलगा जिभाऊ अहिरे व भिका अहिरे यांच्याकडे बोलून दाखविली. या बंधूंनी शेतात सुमारे सहा लाख रुपये खर्चून मंदिर उभारले. मंदिराचा कळस लोकवर्गणीतून उभा केला. प्राणप्रतिष्ठा जितेंद्रदास महाराज, विश्वेश्वर महाराज, पोपट महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात होत आहे. याप्रसंगी मुरलीधर महाराज कढरेकर यांचे कीर्तन तसेच जागरण व हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात गोमाता व नंदी तसेच महादेवाची पिंडी यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रद्धा जोपासण्याचा प्रयत्न
गायीमुळे प्रगती झाली. मानसिक स्वास्थ्य लाभले आणि गायीप्रति असलेल्या धार्मिक भावना आणि श्रद्धेपोटी गोमातेचे मंदिर निर्माण करून श्रद्धा जोपासना करण्याचा प्रयत्न केला, असे ह.भ.प. रावण झिंगू अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button