लासलगावी चित्ररथ व प्रभात फेरीने सर्वांचेच वेधले लक्ष | पुढारी

लासलगावी चित्ररथ व प्रभात फेरीने सर्वांचेच वेधले लक्ष

नाशिक (लासलगाव) वार्ताहर
लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखांतर्फे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाने कोरोना संक्रमण या विषाणूवर विजय मिळविल्याबद्दल वैद्यकीय, पोलीस, स्वच्छता, शासकीय कर्मचारी वर्ग, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक यांच्या कौतुकासाठी “कोरोना योद्धे व कौतुक सोहळा”या आशयाचा चित्ररथ सादर करून त्यावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे जिजामाता कन्या विद्यालयाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजामातांनी केलेल्या संस्कारांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून “जिजामातांचे संस्कार”या आशयावर चित्ररथ सादर केला. तसेच विविधतेत एकतेचे दर्शन घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी सर्वधर्मसमभाव त्यावर आधारित वेशभूषा परिधान केली. तर जिजामाता प्राथमिक शाळेने गीत रामायणावर आधारित देखाव्याचे सादरीकरण चित्ररथाद्वारे केले.
विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व समजावे या उद्दिष्टाने हनुमान व्यायाम शाळेने व्यायामाची विविध प्रात्यक्षिके दाखविली. विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत या उद्दिष्टाने मिरवणुकीत काठी, लाठी, तलवारबाजी, भालाफेक, दांडपट्टा, यासारख्या मैदानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली . तसेच झांजर व लेझीम पथक, एनसीसी, स्काऊट गाईड, हरित सेना, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली.
लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण  करून कलश पुजन आणि कै. दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये निवृत्ती सोनवणे यांनी स्वयंप्रेरणेने वातावरणीय तापमानात झालेल्या वाढीमुळे विद्यार्थ्यांची तृष्णा भागवण्यासाठी सरबताचे वाटप केले. त्याचबरोबर कान्हा डेअरीचे संचालक शंतनू पाटील यांच्यातर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना पाण्याचे पाऊच व लस्सीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका निता पाटील, पुष्पा दरेकर, सिताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, पंचायत समिती सदस्या रंजना पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, डॉ. सुरेश दरेकर, प्रकाश गांगुर्डे, दिलीप पानगव्हाणे, देवीदास पाटील, अशोक धांडे, विठ्ठल गायकर, सुलेमान मुलानी, डॉ. भाऊसाहेब रायते, डॉ. अशोक महाले, दिलीप देसाई, राजेंद्र कराड, सुभाष रोटे, मधुकर सरोदे, दादासाहेब कदम, पोपट नवले, साहेबराव वाकचौरे, मंजू ठोंबरे, डॉ. संगीता सुरसे, मंजुषा पाटील, संध्या रायते, शोभा महाले, फरीदा काजी, संगीता वाकचौरे, सुनिता भामरे, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव पाटील, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी पाटील, पर्यवेक्षक सुधाकर सोनवणे, जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिस काजी आदी मान्यवर तसेच आशा सेविका सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button