टरबूज शेतीतून उन्नतीचा प्रयोग ; 70 दिवसांत 10 लाखांचे उत्पन्न | पुढारी

टरबूज शेतीतून उन्नतीचा प्रयोग ; 70 दिवसांत 10 लाखांचे उत्पन्न

देवळा / खामखेडा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बहुतांश बागायती क्षेत्र असलेल्या खामखेडा गाव परिसरात प्रामुख्याने मका, कांदा, कोबी तसेच भाजीपाला पिके घेतली जातात. त्याला युवा शेतकरी विशाल संजय बच्छाव याने छेद दिला. वडिलोपार्जित तीन एकर आणि वाट्याने चार एकर शेती कसली. त्यातून अवघ्या 70 दिवसात टरबुजाचे 100 टनांहून अधिक उत्पादन घेत 10 लाखांचे उत्पन्न प्राप्त केले.

विशालने आपल्या वडिलोपार्जित शेतीसोबतच चुलते कैलास बच्छाव यांची चार एकर शेती वाट्याने कसायला घेतली होती. गेल्या तीन वर्षार्ंपासून ते टरबूज तसेच भाजीपाला पीक घेतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत टरबुजाचे व्यापारी न मिळाल्याने व कमी बाजारभावामुळे त्यांचे नुकसान झाले. मात्र, खचून न जाता यंदाही टरबुजाचा प्रयोग केला. फेब्रुवारीत ठिंबक सिंचनाचा उपयोग करून मल्चिंग आंथरून चार एकर क्षेत्रात लागवड केली. पाण्याचे व फवारणीचे योग्य नियोजन करीत बहारदार पीक घेतले. नुकतीच टरबूज काढणी सुरू असून, चार एकर क्षेत्रात आजपावेतो 100 टन टरबूज निघाले आहे. अजून 15 ते 20 टन चांगल्या प्रतीचा माल निघणार असून दुय्यम मालदेखील 10 टनांपर्यंत निघेल, अशी आशा आहे. सटाणा येथील व्यापार्‍यांमार्फत त्यांनी हा संपूर्ण माल जम्मू-काश्मीर येथे पाठवला आहे.

परिसरातील प्रयोगशील शेतकर्‍यांच्या शेतीला भेट देत त्याने टरबूज पिकात हातखंडा मिळवला आहे. आई, वडील, भाऊ असे संपूर्ण कुटुंब शेतीत राबते. आवश्यक तेथे मजुरांची मदत घेतली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतकर्‍याने चार एकरात टरबूज फळपिकाची लागवड करून तब्बल 10 लाखांचे विक्रमी उत्पादन घेत शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला. टरबुजाचा दर्जा व गोडवा चांगला असल्याने पहिल्याच तोडणीत 100 टन टरबूज 10 रुपये किलो दराने व्यापार्‍याने खरेदी केला. ही यशोगाथा चर्चेचा विषय ठरली असून, तरुणाचे खामखेडा व परिसरात कौतुक होत आहे.

अतिशय कष्टाने शेतीत झोकून देऊन काम करण्याची पद्धत व पिकाची सखोल अभ्यासपूर्ण माहिती यामुळे विशालने यशस्वी टरबूज उत्पादन घेतले असून, त्याचा कष्टाची ही पावती आहे.
– कैलास बच्छाव, शेतकरी खामखेडा.

हेही वाचा :

Back to top button