नाशिक : अविरत, निर्मल गोदेसाठी ‘हरित ब्रह्मगिरी’ची मुख्यमंत्र्याकडे साद | पुढारी

नाशिक : अविरत, निर्मल गोदेसाठी ‘हरित ब्रह्मगिरी’ची मुख्यमंत्र्याकडे साद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दक्षिणगंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचे उगम स्थान ब्रह्मगिरी पर्वतात आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या अमूर्त जागतिक वारसा स्थळांमध्ये ब्रह्मगिरीचा समावेश आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेने संपन्न ब्रह्मगिरी पर्वत पूर्णतः बोडका झालेला आहे. देशाचा सर्वांत मोठा भूभाग सुजलाम सुफलाम करणार्‍या जीवनदायिनी गोदेच्या अविरत, निर्मल प्रवाहासाठी ‘हरित ब्रह्मगिरी ’ ही काळाची गरज ठरत आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून सोशल मीडियावर विशेष मोहीम राबविली जात आहे.

जगद्विख्यात कुंभमेळा त्र्यंबकराजाच्या चरणी घडतो. ब्रह्मगिरी हा पर्वत नसून महाराष्ट्राच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रगतीचे केंद्रबिंदू आहे. नाशिकच्या पर्जन्यमानासाठी तसेच मराठवाड्याच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत आवश्यक ब्रह्मगिरी पर्वतरांग आहे. या पर्वतावर अनेक दिव्य तीर्थकुंड असूनही वृक्षसंपदेअभावी येथील वनवासी, आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत आहे. वृक्षसंपत्तीवर अवलंबून असणारी नैसर्गिक अन्नसाखळी या भागात नामशेष होत असल्याकडेही मोहिमेद्वारे लक्ष वेधण्यात येत आहे. जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे शहरी भागात वन्यप्राण्यांचे स्थलांतर नित्याचेच झालेले आहे. जलस्रोत, वन्यप्राणी, निसर्ग जीवजंतू सर्वांचाच गाभा असणार्‍या वृक्षसंपदेचे ब्रह्मगिरी पर्वतावर संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी या पर्वतावरील वनविभागाची संपूर्ण जागा वणवे, वृक्षतोड यासारख्या मानवी हस्तक्षेपापासून संरक्षित करण्यासाठी नैसर्गिक कुंपण व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संरक्षित करण्यासह पर्वतावर जाण्यासाठी असणार्‍या पायर्‍यांना संरक्षण जाळी बसविण्याची मागणी केली जात आहे.

सोशल मीडियातून मुख्यमंत्र्यांना साद : हरित ब्रह्मगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियातून साद घातली जात आहे. निर्मल, अविरत गोदेसाठी हरित ब्रह्मगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद ठरेल. धर्मनिसर्ग शिरोमणी ब्रह्मगिरी संवर्धनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात पुढाकार घेण्याची विनंती पर्यावरणप्रेमींकडून मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. आगामी काळात सोशल मीडियावर सुरू असलेल्या या मोहिमेसंदर्भात मुख्यमंत्री काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पाच लाख रोपांची लागवड करणार : यंदाच्या पावसाळ्यात ब्रह्मगिरी पर्वतावर पाच लाख रोपांची लागवड करण्याचा अनेक सामाजिक संस्थांचा निर्धार आहे. हे रोप जगविण्यासाठी लागणार्‍या पाण्याची व्यवस्था शेजारील धरणातून गावकर्‍यांसाठी होत असलेल्या पाइपलाइन व पाण्याच्या टाक्या वाढवून करता येईल. शासनाने संरक्षण व पाण्याची व्यवस्था केल्यास वृक्षलागवडीची जोपासना करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती समोर येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button