म्हापसा : भिकार्‍यांसाठी निवारागृह उभारा | पुढारी

म्हापसा : भिकार्‍यांसाठी निवारागृह उभारा

म्हापसा ; पुढारी वृत्तसेवा : शहरात भीक मागणार्‍यांवर आळा घालण्यासाठी कृती आराखडा करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ‘गोवा कॅन’ने उपजिल्हाधिकारी गुरुदास नाईक यांना दिले. भीक मागणार्‍यांसाठी उत्तर गोव्यात निवारागृह उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भीक मागणार्‍यांचा उपद्रव बाजारपेठेतील व्यापारी व विक्रेत्यांना तसेच ग्राहकांनाही होत आहे. विशेषत: कदंब बसस्थानक, टॅक्सीस्थानक व बाजारपेठ परिसरात या भिकार्‍यांचा सर्वाधिक संचार असतो. भिकार्‍यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून, विक्रेते व ग्राहकांबरोबरच पर्यटकांनाही त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो, असेही पुढे म्हटले आहे.

विद्यमान स्थितीत उत्तर गोव्यातील भिकार्‍यांसाठी निवारागृह उभारण्याची नितांतआवश्यकता निर्माण झाली आहे. ‘गोवा, दमण आणि दीव भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम, 1972’ मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात ‘गोवा कॅन’ने नगर विकास सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, वाहतूक अधीक्षक, पोलिस अधीक्षक, नगर विकास, समाजकल्याण, पर्यटन, महिला आणि बालकल्याण इत्यादी खात्यांचे संचालक, अतिरिक्त वाहतूक संचालक, पालिकेचे मुख्याधिकारी, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार खात्याचे साहाय्यक संचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

संयुक्‍त बैठक आयोजित करा

‘गोवा कॅन’ने मागणी केली आहे, भीक मागणार्‍यांमुळे निर्माण होणार्‍या समस्येशी निगडित असलेले शहरातील पोलिस, वाहतूक पोलिस, म्हापसा पालिका मंडळ, समाजकल्याण संचालनालय, वाहतूक खाते, महिला आणि बालकल्याण विकास संचालनालय अशा विविध यंत्रणांची संयुक्त बैठक उपजिल्हाधिकार्यांनी आयोजित करावी. भिकार्‍यांमुळे होणार्‍या त्रासाबाबत सर्वसामान्य लोक, व्यापारी, ग्राहक, पर्यटक अशा विविध समाजघटकांना दिलासा देणे व भीक मागण्याची सक्ती ज्यांच्यावर केली जाते त्यांचे हितरक्षण करणे यासाठी त्या बैठकीत कृती आराखडा तयार करता येईल.

हेही वाचलंत का? 

Back to top button