नाशिक : कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेतून शेतकर्‍याने संपवले जीवन | पुढारी

नाशिक : कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेतून शेतकर्‍याने संपवले जीवन

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीचा फटका, त्यात कवडीमोल दराने विक्री होणारा शेतीमाल यातून घेतलेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा या विवंचनेत असलेल्या 32 वर्षीय तरुण शेतकर्‍याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चांदवड तालुक्यातील नारायणगाव येथे उघडकीस आली आहे. याबाबत मृत शेतकर्‍याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून वडनेर भैरव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर बारकू पिंपरकर (32) असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्याने पिंपळगाव बसवंत येथील एका बँकेकडून पाच लाख 25 हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची थकीत रक्कम वाढतच असल्याने आणि दुसर्‍या बाजूला दोन-अडीच वर्षांपासून शेतीमालाचे भाव पडत असल्याने कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत त्याने नारायणगाव शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती शिरसाणे गावचे पोलिसपाटील सचिन शिंदे यांनी पोलिसांना कळविली. मृत पिंपरकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

ज्ञानेश्वर पिंपरकर या शेतकर्‍याने एका बँकेकडून कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने ते फेडायचे कसे या विवंचनेत त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेचा पंचनामा करून तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
– शकील शेख, सहा. पोलिस निरीक्षक, वडनेर भैरव

Back to top button