नाशिकमध्ये ओळखींच्याकडूनच अल्पवयीनांसह महिलांवर अत्याचार | पुढारी

नाशिकमध्ये ओळखींच्याकडूनच अल्पवयीनांसह महिलांवर अत्याचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपचार करण्याच्या बहाण्याने शेजारच्याने अल्पवयीन मुलावर केलेला लैंगिक अत्याचार, परिसरातच राहणार्‍या युवकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटना शहरात घडल्या आहेत. अल्पवयीन मुला-मुलींसह महिलांना धोका अनोळखीपेक्षा ओळखींच्याकडून जास्त असल्याचे समोर येत आहे. त्यात नातेसंबंधातील विकृत मानसिकता असलेल्यांकडून पोटच्या मुलीवरही अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

शहरात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असतात. महिलेची तक्रार येताच पोलिसांकडून दखल घेऊन कारवाई केली जाते. त्यानुसार शहरात चालू वर्षात 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान, पीडितांनी केलेल्या तक्रारीनुसार 11 विनयभंग, सहा बलात्कार, विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी 17 गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन पीडितांच्या अज्ञानपणाचा फायदा आरोपींकडून घेतला जात असून, त्यात विनयभंग, अपहरण किंवा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येत असले तरी आरोपींना शिक्षा देण्यात कालावधी जात असल्याचे दिसते.

शहरातील दाखल गुन्ह्यांनुसार विवाहानंतर काही दिवसांतच नवविवाहितांचा छळ सुरू होत असल्याचे दिसते. विवाहितांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून सुरुवातीस तक्रारीची शहानिशा करून न्यायालयामार्फत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतो. तेथेही वाद न सुटल्यास व तक्रारीत तथ्य आढळून आल्यास सासरच्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार पैशांची मागणी, दिसण्यावरून व विवाहबाह्य संबंधामुळे विवाहितांचा छळ होत असल्याचे समोर आले आहे. अनेक विवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, त्यापैकी मोजक्याच विवाहितांच्या नातलगांनी सासरच्यांविरोधात तक्रारी केल्या आहेत. तर इतर विवाहितांच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात किंवा इतर असल्याचे समोर आले आहे.

महिलावर्गास धोका
अल्पवयीन मुला-मुलींवर ओळखींच्याकडून अत्याचार होत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आल्या आहेत. तर प्रेमसंबंध, विवाहाचे आमिष दाखवून अनेकांनी महिलांवर अत्याचार केले आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींपेक्षा ओळखींच्याकडून महिलावर्गास धोका असल्याचे दिसते.

हेही वाचा :

Back to top button