नाशिक : आधी मागितली माफी नंतर आवळला गळा, राहुल जगतापची पोलिसांना माहिती | पुढारी

नाशिक : आधी मागितली माफी नंतर आवळला गळा, राहुल जगतापची पोलिसांना माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादावर चर्चा करताना नानासाहेब कापडणीस व राहुल जगताप यांच्यात वाद झाले. वादात राहुलने नानासाहेब यांना ठोसा मारला. त्यानंतर राहुलने काही वेळानंतर नानासाहेब यांची माफी मागितली. मात्र, नानासाहेबांनी राहुलवर राग व्यक्त करीत तक्रार करेल, असा दम दिला. त्यामुळे राहुलने नानासाहेब यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पैशांच्या लोभातून राहुलने आठ दिवसांत डॉ. अमितचा खून केल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले आहे.

संशयित राहुल जगतापने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संशयित राहुल जगतापने त्याच्या पत्नीचा प्लॉट गहाण ठेवला होता. मात्र, कर्जफेड न झाल्याने प्लॉटचा लिलाव झाला होता. त्यानंतर या पती-पत्नींमध्ये वाद सुरू झाले होते. त्यातच राहुलने मद्यसेवन वाढवले होते. दरम्यान, डिसेंबर महिन्यात गंगापूर नाका येथे नानासाहेब कापडणीस भेटल्यानंतर राहुलने, मला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगून त्यांना कारमध्ये बसवले. त्यांच्यात कौटुंबिक वादावर चर्चा सुरू असताना वाद झाला. संतापाच्या भरात राहुलने नानासाहेबांना ठोसा मारला. त्यामुळे नानासाहेब बेशुद्ध पडले. त्यामुळे घाबरून राहुलने नानासाहेबांना कारमध्ये बसवून नाशिकबाहेर नेले. तेथे त्याने चेहर्‍यावर पाणी शिंपडून नानासाहेबांना उठवून त्यांची माफी मागितली. मात्र, नानासाहेबांनी त्याला माफ केले नाही. त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने राहुलने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकला. दरम्यान, नानासाहेबांचा मृतदेह जाळण्यासाठी राहुलने त्यांचे कपडे पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह गवतावरून घसरून दरीत गेल्याने राहुलने तेथील गवत पेटवून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

नानासाहेबांचा खून करून राहुल घरी आला. डॉ. अमितने वडील नानासाहेबांची चौकशी न केल्याने राहुल निश्चिंत झाला. मात्र, त्याच्याशी चर्चा करताना, नानासाहेबांच्या शेअर्स व स्थावर मालमत्तेची माहिती मिळाल्यानंतर राहुलने अमितचाही खून केला.

अमितला फिरण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेत त्याच्यावर हल्ला करून त्याला जिवे मारले. दोघांचे खून केल्यानंतर तो रत्नागिरीला फिरण्यासाठी गेला. तेथून परत आल्यानंतर कोणालाही कापडणीस कुटुंबीयांबद्दल माहिती नसल्याचा अंदाज आल्याने राहुलने शेअर्स विक्री करून आर्थिक व्यवहार केले.

डॉ. अमितच्या मृतदेहाची विल्हेवाट

पोलिसांच्या तपासात संशयित राहुल जगतापने डॉ. अमितच्या डोक्यात दगड घालून, त्याला गंभीर जखमी केेले. त्याला मारहाण करत असताना समोरून वाहन येत असल्याने त्याने राहुलला कारमध्ये टाकले. त्याच अवस्थेत राहुलला शहरात फिरवत त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. नाशिक जिल्ह्यात मृतदेह टाकल्यास आपण फसू याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यातच पालघर जिल्ह्यात नानासाहेबांचा मृतदेह फेकल्याने तेथील पोलिस सतर्क असतील, त्यामुळे राहुलने कार भगूरमार्गे अहमदनगर जिल्ह्याच्या वेशीवर नेली. तेथे राजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमितचा मृतदेह टाकून चेहऱ्यावर स्पिरिट टाकून ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

Back to top button