पर्यटन महोत्सवाची मांदियाळी ; नाशिक-नांदूरमध्यमेश्वर बर्ड सायक्लोथॉनचे आयोजन | पुढारी

पर्यटन महोत्सवाची मांदियाळी ; नाशिक-नांदूरमध्यमेश्वर बर्ड सायक्लोथॉनचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पर्यटनस्थळे सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहेत. स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत नाशिक विभागात तीन महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 5 व 6 मार्चला नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षी महोत्सव, दि. 12 व 13 मार्चला भंडारदरा येथे हरिश्चंद्र-कळसूबाई महोत्सव, तर दि. 19 व 20 मार्चला नाशिक ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव होणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटन महोत्सव रद्द करण्यात आले होते. यंदा स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालयाच्या विद्यमाने मार्च 2022 पर्यंत पाच पर्यटन महोत्सव आयोजित करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. पक्षी महोत्सवानिमित्त दि. 5 मार्चला सकाळी नाशिक-नांदूरमध्यमेश्वर बर्ड सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

भंडारदरा येथील हरिश्चंद्र-कळसूबाई महोत्सवात पर्यटकांना ट्रेकिंगची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच परिसरातील आदिवासी बांधवांनी भरड धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे, तर नाशिक शहरालगत गंगापूर धरण परिसरातील ग्रेपसिटी पार्क येथे होणार्‍या ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सवात स्थानिक शेतकर्‍यांना द्राक्ष विक्रीसाठी विशेष स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान, तीनही महोत्सवांच्या माध्यमातून पर्यटन विकासाला गती देण्याचा प्रयत्न असून, पर्यटकांनी या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

अशी असणार मेजवानी
पर्यटन महोत्सवात नाशिक जिल्ह्यासह विभागातील स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शन, ट्रेकिंग, विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने, छायाचित्र, चित्रकला स्पर्धा, पोवाडा, पथनाट्य, आदिवासी लोकनृत्य (सोंगी), पक्षिनरीक्षण, खाद्यसंस्कृती, हस्तकला, सांकृतिक आदी कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

नाशिक विभागात अनेक गड-किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहेत. आगामी काळात याच ठिकाणी महोत्सव घेण्याचा विचार असून, त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून दुर्लक्षित गड-किल्ले पर्यटकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत, तर पर्यटन विकासासाठी वन व पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली जिल्हा उत्सव समिती गठित करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.
– मधुमती सरदेसाई-राठोड,

Back to top button