जळगाव : बीएचआर घोटाळ्यात सुनील झंवर याला जामीन | पुढारी

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात सुनील झंवर याला जामीन

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर याला अखेर जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराने एके काळी प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अद्यापही बहुतांश संचालक कारागृहातच आहेत. यानंतर बँकेवर जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. मात्र त्यांनी इतर दलालांना हाताशी धरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याची उघडकीस आले. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायिक सुनील झंवर याचाही समावेश होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. मध्यंतरी त्याला अटकेपासून १५ दिवस दिलासा मिळाला होता. १० ऑगस्ट २०२१ रोजी त्याला पहाटे पोलिसांनी नाशिक येथून अटक झाली होती. पुढे सुनील झंवर याचा जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आला होता. तथापि, सोमवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Back to top button