धुळे : स्थायी समिती सभापतीपदी शितलकुमार नवले बिनविरोध | पुढारी

धुळे : स्थायी समिती सभापतीपदी शितलकुमार नवले बिनविरोध

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पार्टीचे शीतलकुमार नवले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारताना धुळे शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रम देणार असून पक्षाने दिलेली जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विभागाच्या सभापती पदावर योगिता बागुल तर उपसभापती पदावर आरती पवार यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत आहे. या महापालिकेच्या 72 पैकी 52 जागांवर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि अन्य विषय समित्यांच्या पदावर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विराजमान आहेत. दरम्यान स्थायी समिती सभापती संजय जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शीतलकुमार नवले यांनी अर्ज दाखल केला. बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यानुसार आज त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.

यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप करपे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिक्रिया देताना शीतलकुमार नवले यांनी सांगितले की, धुळे शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने वचननाम्यात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये धुळे शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलवाहिनीचे काम मंजूर करण्यात आले. मात्र त्यानंतर राज्यात आघाडीचे सरकार आल्यामुळे विकास कामासाठी निधी देण्यास विलंब झाला. त्यामुळे जलवाहिनीचे काम रखडले आहे. परिणामी धुळेकरांना नियमित पाणी मिळत नाही. मात्र येणाऱ्या काळात या योजनेला प्राधान्य देऊन धुळेकर यांचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान महिला आणि बालकल्याण विभाग सभापती पदावर योगिता प्रशांत बागुल आणि उपसभापती पदावर आरती अरुण पवार यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या दोघांनी देखील आज पदभार स्वीकारला असून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Back to top button