नाशिक मनपा बजेट : ‘इतक्या’ कोटींचे अंदाजपत्रक सादर ; ‘या’ नव्या घोषणा | पुढारी

नाशिक मनपा बजेट : 'इतक्या' कोटींचे अंदाजपत्रक सादर ; 'या' नव्या घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  : गेल्या दोन वर्षांपासून काेरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिकेने कोणत्याही प्रकारची करवाढ न करता, २२२७.०५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. विकासकामांच्या दायित्वाचा आकडा २४३८ पर्यंत पोहोचल्याने २०२२-२३ या आर्थिक वर्षात अवघे १४५ कोटी रुपये विकासकामांसाठी उपलब्ध होणार असून, कोरोनामुळे २०२१-२२ मध्ये तब्बल ३०० कोटींची झळ महापालिकेला सहन करावी लागली आहे.

स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंगळवारी (दि. ८) सादर केलेले अंदाजपत्रक स्वीकृत करीत त्यास मान्यता दिली. स्थायी समितीकडे सादर झालेल्या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या शिफारशी तसेच विकासकामांचा अंतर्भाव करून, महासभेवर सभापती गिते अंदाजपत्रक सादर करतील. गेल्या दाेन वर्षांत कोराेनामुळे उत्पन्नात माेठी घट होऊनही, नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सत्ताधारी भाजपने होऊ द्या खर्च, असाच कामांचा रपाटा लावला. त्यामुळे दायित्वात मोठी भर पडली असून, २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात जवळपास ११५ काेटीची तूट निर्माण झाली आहे. २०२१-२२ चे अंदाजपत्रक ५३९ काेटींच्या आरंभीच्या शिलकीनुसार २३४२ काेटी इतके हाेेते.

नवीन अंदाजपत्रक ११५ काेटीने घटून, २२२७ काेटी इतके झाले आहे. चालू वर्षाच्या २३४२ काेटीच्या अंदाजपत्रकात घट येऊन सुधारित अंदाजपत्रकात हीच रक्कम आता २२१९ काेटी इतकी झाली आहे. चालू वर्षाच्या (२०२१-२२) अंदाजपत्रकात २०१ काेटींची तरतूद रस्त्यांसाठी प्रस्तावित केली होती. आगामी मनपा निवडणूक लक्षात घेता, नगरसेवकांना खूश करण्यासाठी ४३४ काेटींच्या रस्ते याेजनेला मंजुरी दिली. आता सुधारित अंदाजपत्रकात रस्त्यांंची तरतूद वाढवून ३४७ काेटी रुपये केली आहे.

महापालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रक सादर करताना, अंदाजपत्रक पुस्तिकेत ठळक याेजनांची माहिती दिली जाते. मात्र, यावेळी महापालिकेच्या सर्वच विभागांतील याेजनांची त्रोटक, तर काही कामांची माहितीच अर्थ व वित्त विभागाकडून देण्यात आलेली नाही. घरपट्टीपाेटी ११० काेटी वसुलीचे उद्दिष्ट होते.

नाेव्हेंबर २०२१ अखेर केवळ ९९.४२ काेटी जमा झाले आहेत. वास्तविक जानेवारी २०२२ अखेरपर्यंतची आकडेवारी देणे अपेक्षित होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांची आकडेवारी दडविण्यामागील हेतू समजला नाही. पाणीपट्टीपोटी मिळणारा महसूल ७५ काेटी जमा गृहीत धरताना, चालू वर्षी आतापर्यंत किती रक्कम जमा झाली, याविषयी माहितीच दिलेली नाही. नगरनियाेजन विभागाकडून ३०२ काेटी येण्याचा अंदाज असताना, जानेवारी २०२२ अखेर किती महसूल जमा झाला, याची माहितीच दिली नाही. घंटागाडी योजनेवर ३५४ काेटी खर्च होणार आहे. असे असताना चालू वर्षात झालेला खर्च नमूद करण्यात आलेला नाही.

असे मेडिकल कॉलेज

मनपामार्फत पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत बिटकाे रुग्णालयात मेडिकल कॉलेज उभारले जाईल. त्यासाठी एकूण ५० कोटी खर्च अपेक्षित असून, २०२२ च्या अंदाजपत्रकात १५ कोटींची तरतूद केली आहे. या मेडिकल कॉलेमध्ये विभागप्रमुख, अधिव्याख्याता यांचे कार्यालय, क्लासरूम, लायब्ररी अशी व्यवस्था असेल.

अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या बाबी

– घरपट्टी, पाणीपट्टी करात कोणतीही वाढ नाही

– बिटको रुग्णालयात मेडिकल कॉलेजसाठी १५ कोटींची तरतूद

– प्रत्येक बांधकाम इमारतीत २५ फ्लॅटमागे एक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

– नगरसेवकांना ३० लाख प्रभाग विकास निधी मिळणार

– सिटीलिंक बससेवेसाठी ९० कोटींची तरतूद

– बांधकामांसाठी सर्वाधिक ३७८ (१७.०६ टक्के) कोटींची तरतूद

– प्रत्येक विभागात एक याप्रमाणे ई-स्मार्ट स्कूल उभारणार

– गोदावरी संवर्धनासाठी २८.८८ कोटींची तरतूद

– सहाही विभागांत १० हजार वृक्ष लागवडीसाठी २१ कोटींची तरतूद

– उड्डाणपूल व सांडव्यांसाठी ५० कोटींची तरतूद

– आयटी हबसाठी १० कोटींची तरतूद

– निवडणुकीसाठी १५ कोटींची तरतूद

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

Back to top button