अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई | पुढारी

अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर (या.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
गुजरात सीमा पिंपळनेर शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात चोरट्या मार्गाने मद्यतस्करी, गोवंश तस्करी, गुटखा तस्करी तसेच अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून वाहतूकीचे प्रकार नित्याने घडतच आहेत. यावर अनेकदा संबंधित विभागाकडून कारवाई केली जाते. अवैधरित्या होणारी मद्याची चोरटी वाहतूक पिंपळनेर पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले  असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेतल्यानंतरची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर झालेल्या या कारवाईत पोलिसांनी १ लाख १३ हजार ८८१ रुपयांचे देशी-विदेशी मद्य तसेच ७ लाख ५० हजारांचे वाहन असा ८ लाख ६३ हजार ८६१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यापूर्वी अवैधरित्या होणारी मद्य वाहतूक  व गोवंश तस्करी तसेच दुचाकी चोरट्यांच्या टोळीला पकडण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान अवैध धंद्यांबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याबाब विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग, नाकाबंदी लावण्यात येऊन तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती संकलित केली जात होती. साक्री विभागात विभागीय गस्त असल्याने श्रीकृष्ण पारधी, पो.हे.कॉ. कांतिलाल अहिरे व चालक पो.कॉ.रवींद्र सूर्यवंशी पेट्रोलींग करीत असतांना गुरुवार, दि. 29 रात्री १.३० च्या सुमारास पिंपळनेर ते नवापूर रस्त्यावर काकशेवड गावाच्या शिवारात नवापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ह्युंडाई कंपनीच्या वाहनाचा संशय आल्याने वाहन थांबविण्याचा इशारा केला. परंतु वाहनचालकाने वाहन न थांबवता काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाला. वाहन ( एम.एच.४८ ए.सी.१५२५) लॉक असलेल्या स्थितीत मागील सिटवर तसेच डिक्कीमध्ये देशी-विदेशी कंपनीचा अवैध मद्यसाठा मिळून आला. हा मद्यसाठा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, हेकॉ कांतीलाल अहिरे,सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक पवार,पोकों पंकज वाघ,रवींद्र सूर्यवंशी,राकेश बोरसे यांनी ही कारवाई केली. पो.ना.अतुल पाटील हे पुढील तपास करित आहेत.

हेही वाचा:

Back to top button