अहमदनगर : विदेशी मद्यासह तिघांना पकडले; भिंगार पोलिसांची कारवाई | पुढारी

अहमदनगर : विदेशी मद्यासह तिघांना पकडले; भिंगार पोलिसांची कारवाई

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या तिघांना भिंगार पोलिसांनी पकडले. या कारवाईत विदेशी दारूसह मोटार असा पंधरा लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांवर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पथकाने मंगळवारी (दि.27) रात्री ही कारवाई केली.

शहादेव मारुती महाडिक (वय 42, रा. शेरी बुद्रुक, ता.आष्टी, जि.बीड), नवनाथ दिलीप लोखंडे (वय 31, रा.चांभार गल्ली कडा, ता.आष्टी, जि.बीड), अक्षय आजीनाथ महाडिक (वय 27, रा.शेरी बुद्रुक, ता.आष्टी, जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. नगर शहरातून जामखेड रस्त्याने एका वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांना बातमीदारामार्फत मिळाली होती.

या माहितीच्या आधारे दिनकर मुंडे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. छावणी परीषदेच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर नाकाबंदी करून पथकाने स्कॉर्पिओ वाहनाला हात दाखवून थांबविले. वाहनाची झडती घेतली असता विदेशी दारूचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. विविध कंपनीचे दारूचे बॉक्स व चारचाकी वाहन असा पंधरा लाख 27 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सहायक फौजदार रमेश वराट, रेवननाथ दहीफळे, संदीप घोडके, रेवन्नाथ मिसाळ, संतोष आडसुळ, दीपक शिंदे, अमोल आव्हाड, संजय काळे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

रूईछत्तीशी : वनराईकडे पर्यटकांनी फिरविली पाठ

मान्सून अपडेट : जून अखेरीस जिल्ह्यात सरासरी ४५ टक्क्यांवर

मान्सून अपडेट : जून अखेरीस जिल्ह्यात सरासरी ४५ टक्क्यांवर

Back to top button