Nashik accident : बसच्या धडकेत तिघे ठार, संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको | पुढारी

Nashik accident : बसच्या धडकेत तिघे ठार, संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

नाशिक :

चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने पिंपळगावकडे येणाऱ्या बसने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अपघातानंतर शिरवडे वणी येथील गावकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे.

महेश चंद्रकांत निफाडे, सुभाष माणिकराव निफाडे आणि नितीन भास्कर निफाडे हे तिघेही शिरवाडे वणी फाट्यावर दुचाकीने जात असताना चांदवड  बाजूकडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एस. टी. बस ने त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यावर तत्काळ रुग्णवाहिकेने प्रथमेश पावले यांनी जखमींना पिंपळगाव प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. संशयित बसचालक अपघाताची खबर न देता पळून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button