धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे | पुढारी

धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या पाच वर्षात धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी गटाने केलेल्या कामांचा हिशोब आता भविष्यातील निवडणुकीत जनता चुकता करणार आहे. प्रभागांची कितीही मोडतोड केली तरीही त्याचा उपयोग होणार नसल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसाठी पुन्हा हालचाली होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने  माजी आमदार अनिल गोटे यांनी सत्ताधारी गटावर शरसंधान केले आहे. धुळे महानगरपालिकेत येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुन्हा भ्रष्टाचार करण्याची संधी मिळावी. म्हणून सत्तारूढ पक्षाचे नेते आतापासून प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात या गटाने जनतेचा अमर्याद छळ केला आहे. डिसेंबर अखेरीस दर दोन दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र सध्यस्थितीत धुळे शहरातील असंख्य वस्त्यांमध्ये आठ ते दहा दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने पिण्याच्या पाण्यासाठी पैसे माेजावे लागत आहे. तसेच शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असून हद्दवाढ झालेल्या गावांमधील रस्त्यांवर किरकोळ पाऊस झाला तर पायी चालणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने केलेले रस्ते हे अतिक्रमण न काढता केले असल्याने दर्जाहीन रस्त्यामुळे आणखी मोठी समस्या निर्माण झाली आहे, असा आरोप गोटे यांनी यावेळी केला. धुळे महानगरातून जाणाऱ्या नाल्या काठच्या वसाहतींमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. यंदा देखील अशी संभाव्य परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाने समस्या कमी करण्यासाठी कोणतेही परिणामकारक प्रयत्न केले नसल्याचा दावा माजी आमदार गोटे यांनी केला आहे. धुळे महानगरातील समस्या कमी न झाल्यामुळे आता सोयीचे प्रभाग तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सोयीचे कितीही प्रभागांची मोडतोड केली तरीही जनता निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करणार असल्याचा आरोप देखील गोटे यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा:

Back to top button