नाशिक : जगन्नाथ भगवान रथोत्सवात लोटला जनसागर | पुढारी

नाशिक : जगन्नाथ भगवान रथोत्सवात लोटला जनसागर

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

‘जगन्नाथ भगवान की जय’ असा नारा देत नाशिकमध्ये यंदा प्रथमच भगवान जगन्नाथ रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आला. या रथोत्सवात भाविकांनी अलोट गर्दी केली होती. जुना आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरासमोर लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत राम स्नेहीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विधिवत पूजनाने रथोत्सवाला प्रारंभ झाला.

श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी साधू-संत व मान्यवरांचे स्वागत केले. निमाचे अध्यक्ष, उद्योजक धनंजय बेळे व प्रेरणा बेळे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. रथोत्सवात हिंगोली येथील महंत कौशल्यदास महाराज, महंत रामदास महाराज, फलहारी महाराज, महंत नृसिंहचार्य महाराज, महंत बालकदास महाराज, रामतीर्थ महाराज आदींसह विविध धार्मिक संस्थानचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

भगवान हनुमान, श्रीराम प्रभूसह विविध देव-देवतांच्या केलेल्या वेशभूषा सर्वांचेच आकर्षण ठरले. महिलांनी फुगडीचा आस्वाद घेतला. रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी रथाचे पूजन करण्यात आले. रथमार्गावर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करत रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, माजी आ. बाळासाहेब सानप, माजी महापौर विनायक पांडे, दशरथ पाटील, के. सी. पांडे, रुची कुंभारकर, राजेंद्र महाले, महेंद्र आव्हाड, रामसिंग बावरी, शांताराम दुसाने, फौजी महाराज सूर्यवंशी, त्र्यंबक गायकवाड, नंदू कहार, सचिन डोंगरे, विनोद थोरात, सचिन लाटे, मनीष गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रथोत्सवात हजेरी लावली. रथोत्सवासाठी उद्याेजक धनंजय बेळे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिला.

रथाचे ठिकठिकाणी स्वागत

रथाचे प्रथम स्वामी रामतीर्थ महाराज यांनी स्वागत केले. त्यानंतर रथमार्गावर शहर काँग्रेस कमिटी, रणरागिणी फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बोडके, सोनाली बोडके, गणेशवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते महेश अग्रवाल, दहीपूल येथे निवृत्त पोलिस बाळासाहेब देशपांडे यांनी रथाचे स्वागत बॅण्ड पथकाद्वारे केले. नेहरू चौक येथे माजी नगरसेवक विनायक खैरे, शिवसेना युवा सेनेचे व सावाना पदाधिकारी गणेश बर्वे यांच्यासह मालेगाव स्टॅण्ड, भक्तिदास महाराज, भगवंत पाठक, मामा राजवाडे, श्री काळाराम मंदिर येथे विशस्वत मंडळातर्फे रथाचे पूजन करण्यात आले. याठिकाणी श्री काळाराम यांचा पुष्प भगवान जगन्नाथ यांना, तर भगवान जगन्नाथ यांचा पुष्पहार श्री काळाराम यांना देण्यात आला. पुष्पमालातर्फे दोन्ही देवतांची भेट झाली. गोरेराम मंदिर येथे महंत राजाराम महाराज यांनी पूजन केले.

तिन्ही आमदारांनी ओढला रथ

रथोत्सवात आमदार राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे यांनी सहभागी होऊन रथ ओढत भगवान जगन्नाथाचे आशीर्वाद घेतले.

हेही वाचा : 

Back to top button