बंदीतील प्लास्टिक विक्रीप्रकरणी 52 हजार दंड | पुढारी

बंदीतील प्लास्टिक विक्रीप्रकरणी 52 हजार दंड

सांगली, पुढारी वृत्तसेवा : बंदीतील प्लास्टिक वस्तूंच्या विक्रीप्रकरणी सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. विविध आस्थापना, व्यक्तींकडून 52 हजार रुपये दंड वसूल केला. 40 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

सिंगल युज प्लास्टिकवर कारवाईची मोहीम सुरू आहे. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी महापालिका आणि प्रदूषण मंडळाच्या संयुक्त पथकाने गणपती पेठ, वखारभाग तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये अनेक दुकानांची तपासणी केली. प्लास्टिक साहित्य, डिस्पोजल, पत्रावळी विक्री करणार्‍या दुकानांची तपासणी केली. पाच दुकानांमध्ये बंदी घातलेले प्लास्टिक विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. एम.के. प्लास्टिक, दुर्गा प्लास्टिक, मोना प्लास्टिक, आरती डिस्पोजल, आर. आर. विभुते, जी. एम. मेडिकल 6 दुकानांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 30 हजार दंड वसूल करण्यात आला. 300 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले, अशी माहिती महापालिकेतून देण्यात आली.

बंदी असणार्‍या प्लास्टिकवर आणि त्याचा साठा आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. प्लास्टिक साहित्य विक्री करणार्‍या दुकानांनी बंदी असणारे प्लास्टिक विक्रीसाठी ठेवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.

अनेक मेडिकलमध्ये कान साफ करण्यासाठी प्लास्टिक बट्स विक्री केले जात आहेत. प्लास्टिक कांडी असणारे बट्स विक्री करणार्‍यावर कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक बट्स पटेल चौकातील एका मेडिकलमध्ये आढळून 5 हजाराचा दंड केला. मिरजेत प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये कारवाई केली. 20 हजार रुपये दंड वसूल केला.

कुपवाडमध्ये 20 व्यक्तींना दंड

कुपवाड येथील प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील फळ विक्रेते, फुल विक्रेते व बाजारपेठमध्ये सिंगल युज प्लास्टिक तपासणी करण्यात आली. 19 दुकाने तपासली. प्लास्टिक हाताळणीबाबत 20 व्यक्तींना प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे एकूण 2 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. दहा किलो प्लास्टिक जप्त केले.

Back to top button