नाशिक : जलसंधारणाच्या ३ हजार कामांमधून गावे होणार “पाणीदार’ | पुढारी

नाशिक : जलसंधारणाच्या ३ हजार कामांमधून गावे होणार "पाणीदार'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० योजनेंतर्गत २३१ गावांमध्ये जलसंधारणाची २ हजार ९४३ कामे करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समितीने प्रस्तावित कामांसाठी २०६.४७ काेटी रुपयांच्या निधी खर्चास मान्यता दिली आहे. जलसंधारणाच्या या कामांमधून वर्षभरात गावे पाणीदार होण्यास मदत होणार आहे.

शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान २.० योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे गावांमधील पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करणे, भूजल साठ्यात वाढ करणे, शाश्वत स्रोतावर भर देणे आदी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यानूसार अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड अंतिमत: करण्यात आली आहे. या गावांचा जलआराखडा तयार करून त्यानिहाय तेथे शेततळे उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरणाद्वारे पाणी साठवणे, सूक्ष्म सिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्त्वाने सिंचन व्यवस्था करणे, सिंचन आदी कामे हाती घेतली जाणार आहेत.

या अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांचे जलआराखडे हे निश्चित करण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषद, जलसंपदा, वनविभागासह अन्य विभागांची कामे प्रस्तावित केली असून, त्यांची संख्या २ हजार ९४३ इतकी आहे. तालुका समितीच्या मान्यतेनंतर जिल्हास्तरीय समितीने त्याला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याच्या मान्यतेमुळे अभियानाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच या कामांना प्रारंभ होणार असून, भविष्यात संबंधित गावांमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्यास मदत होईल.

म्हणून आराखड्याला गती

यंदाच्या वर्षी मान्सून लांबल्याने जलयुक्त शिवारच्या कामांना गती देता येऊ शकते हा असा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांपुढे मांडला हाेता. मे अखेरपर्यंत निवड झालेल्या गावांचे जलआराखडे तयार करून त्याला मान्यता घ्यावी. तसेच १५ दिवसांत तातडीने निविदाप्रक्रिया राबवित कामे सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार यंत्रणांनी युद्धपातळीवर आराखडे अंतिम केले आहेत.

सर्वाधिक कृषीची कामे

जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या २३१ गावांमधील कामांसाठी २०६.४७ कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांमध्ये कृषी विभागाच्या सर्वाधिक १३९९ कामांचा समावेश आहे. याशिवाय उपवनसंरक्षकची ७३६, जि.प.च्या जलसंधारणची ३२५, भूजल- सर्वेक्षणच्या ३०० आणि मृद व जलसंधारणची १८३ कामेदेखील यामध्ये प्रस्तावित आहेत.

हेही वाचा : 

Back to top button