सवंगड्यांच्या भेटीत पहिला दिवस ! शाळांमध्ये पुस्तके, वह्या अन् नव्या अभ्यासाची उत्सुकता | पुढारी

सवंगड्यांच्या भेटीत पहिला दिवस ! शाळांमध्ये पुस्तके, वह्या अन् नव्या अभ्यासाची उत्सुकता

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील शाळा गुरूवारी सुरू झाल्या. पालकांचे बोट पकडून उत्साहात आणि नव्या वह्या-पुस्तकांच्या उत्सुकतेने विद्यार्थी शाळेत दाखल झाले. तसेच आपल्या सवंगड्यांच्या भेटीचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावर दिसत होता. त्यांचे शाळांमध्ये अनोखे स्वागत झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छोटा भीम आणि डोरेमोन यांनी हजेरी लावली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विद्यार्थ्यांना औक्षण केले.

मॉडर्न प्राथमिक विद्यालयात शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुग्यांची कमान उभारण्यात आली होती. मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये डोरेमोन, मिकी माऊस, छोटा भीम आदींचे पोस्टर चिकटविण्यात आले होते. कार्टून्स पाहून विद्यार्थ्यांनाही आनंद झाला होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पेरूगेट भावे हायस्कूलमध्ये प्रवेशद्वारावर ‘स्कूल चले हम’ या आशयाचे चित्र रेखाटण्यात आले होते.

स्वागताला विदूषक अन् कॅडबरीची भेट
पुणे महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथे शाळेचा पहिला दिवस ‘स्कूल चले हम’ या घोषणांनी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. हसतमुखाने स्वागत करणारे विदूषक आणि कॅडबरीची भेट, यामुळे विद्यार्थीवर्गाचे चेहरे फुलले होते. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅडबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागूल आणि शिक्षकवृंदाने जंगी स्वागत केले. या वेळी तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास उपस्थित राहत त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले.

प्रबोधनपर नाटकाच्या प्रयोगाने शाळेची सुरुवात
वडगाव शेरी येथील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘लांडग्यांना दुष्ट का म्हणतात?’ या प्रबोधनपर नाटिकेचा प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकाला नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘अफवा पसरवू नये’ अशा आशयाचे हे प्रभावी नाटक पाहून सर्व विद्यार्थ्यांनी ‘आम्ही यापुढे कोणत्याही प्रकारची जात, धर्म, विद्यार्थिमित्रांचे वर्ण, रंग, व्यंग याबाबत कुठलीही अफवा पसरविणार नाही’ अशी शपथ घेतली.

‘माझे शाळेतील पहिले पाऊल’ उपक्रमांतर्गत उमटले पाऊल ठसे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत ममाझे शाळेतील पहिले पाऊलफ या शासनाच्या उपक्रमानुसार पहिलीतील प्रत्येक मुलाच्या पावलाचे कागदावर ठसे घेण्यात आले. शाळेने तयार केलेल्या खास सेल्फी पॉइंटजवळ विद्यार्थी व पालकांनी फोटोसेशनही केले. सर्व मुलांना बुंदीचा लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.

 

Back to top button