नाशिकमधील वीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे | पुढारी

नाशिकमधील वीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकरचे छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यातील २० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयासह निवासस्थानी, फार्म हाउसवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (दि. २०) सकाळी एकाच वेळी छापे टाकले. नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई कार्यालयांतील सुमारे १२५ अधिकारी – कर्मचाऱ्यांचे पथक या मेगाकारवाईत सहभागी झाले आहेत.

शहरातील बहुतांश बांधकाम व्यावसायिकांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यांनी कागदोपत्री कमी आर्थिक व्यवहार दाखवून कर चुकविल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विभागाने शहरातील महात्मा गांधी राेडवरील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पहाटे 6 ला छापा टाकून कागदपत्रे तपासणी केली. त्याचबरोबर रविवार कारंजा, गंगापूरराेड, काॅलेजराेड, मुंबई नाका, फेम टाॅकीजसमाेर, अशाेका मार्ग, द्वारका व नाशिकराेड भागातील बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानांसह कार्यालये, व्यवस्थापकांसह-अकाउंटंट, संचालकांची चाैकशी सुरू केली. प्राप्तिकर विभागाने खबरदारी म्हणून नेहमीप्रमाणे जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी केली. त्यासाठी त्यांनी बुधवारी (दि. १९) रात्री शिर्डी येथे एकत्रित बैठक घेऊन गुरुवारी (दि. २०) पहाटेच नियाेजनानुसार हे विविध छापे टाकल्याचे समजते.

गोपनीयतेवर भर

पहाटे 6 पासून बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालयांबाहेर प्राप्तिकर विभागांची वाहने पथकासह दाखल झाली होती. या पथकांनी काही वाहने खासगी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या वापरण्याची दक्षता घेतली. जेणेकरून छापेमारीबाबत चर्चा पसरणार नाही, याची खबरदारी प्राप्तिकर विभागाने घेतल्याचे दिसून आले. सायंकाळपर्यंत छापे सुरू होते. मात्र, या कारवाईत विभागाने कोणती कागदपत्रे जप्त केली, किती रुपयांचे व्यवहार आढळून आले किंवा किती मुद्देमाल जप्त केला याबाबत कोणतीही माहिती प्राप्तिकर विभागाने दिली नाही.

इगतपुरी येथेही छापासत्र

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने इगतपुरी शहरासह महामार्गावरील इगतपुरीनजीक हाॅटेल – रिसाॅर्टवर छापा टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. इगतपुरी शहरातील एका लाॅटरी व्यावसायिकासह हॉटेल व्यावसायिकाकडे सुमारे १० ते १५ अधिकाऱ्यांनी चाैकशी केल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button