संशोधन केंद्राचा पक्षी उडेना ! दीड कोटी रुपये खर्चूनही पुणे महापालिकेकडून काम अपूर्ण | पुढारी

संशोधन केंद्राचा पक्षी उडेना ! दीड कोटी रुपये खर्चूनही पुणे महापालिकेकडून काम अपूर्ण

हिरा सरवदे : 

पुणे : आठ महिन्यांत नव्वद लाख खर्चून शिवाजीनगर येथे उभारण्याचे नियोजन करणार्‍या महापालिकेला दीड कोटी रुपये खर्चूनही गेल्या सात वर्षांत हे केंद्र पूर्ण करता आलेले नाही. केंद्राची उर्वरित कामे करण्यासाठी आणखी 25 लाखांच्या निधीची आवश्यकता असून, हा निधी मिळविताना अधिकार्‍यांची दमछाक होत आहे. पक्षिप्रेमी, निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांचे निरीक्षण करून अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात पक्षिसंशोधन केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे.

या केंद्रासाठी विधानपरिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांनी आपल्या निधीतून 2013-14 मध्ये 95 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीने या प्रकल्पाचे 95 लाखांचे पूर्वगणनपत्रक तयार केल्यानंतर 20 सप्टेंबर 2016 रोजी स्थायी समितीने 87 लाख 53 हजार 228 रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. हे काम आठ महिन्यांत पूर्ण करण्याची अट निविदेत होती. निविदेनुसार ठेकेदाराने लकाकी तळ्याच्या पाठीमागील बाजूस जगताप डेअरीजवळ पक्षिसंशोधन केंद्राचे काम सुरू केले. मात्र, गेली सात वर्षे या संशोधन केंद्राचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. एस्टिमेट कमिटीने तयार केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा जास्त म्हणजे जवळपास दीड कोटी रुपये या प्रकल्पासाठी आजवर खर्च झाले आहेत. या पैशामध्ये पक्ष्याच्या चोचीचा आकार असलेले एक त्रिकोणी आकाराचे काच असलेले लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यात आले आहे. त्याला लोखंडी जीना आहे. सध्या निधी नसल्याने त्यांची काही कामे रखडलेली आहेत.

या केंद्रात अद्याप वायरिंग, सीसीटीव्ही, विविध प्रकारच्या दुर्बिण, पक्षिप्रेमी विद्यार्थी यांना माहिती देण्यासाठी डिस्प्ले आदी कामे विद्युत विभागामार्फत केली जाणार आहेत. यासाठी आणखी किमान 25 लाख लागणार असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. कमी पडणारा निधी कोठून उपलब्ध केला जाणार? याबाबत मात्र प्रशासनाकडून काहीही सांगितले जात नाही. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास किती वेळ लागणार? हे कोणीही सांगू शकत नाही.

तळजाई, पाषाणसह टेकड्यांवरही केंद्र करण्याचे नियोजन – मॉडेल कॉलनी येथील पक्षिसंशोधन केंद्र लवकरत लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर पक्षिप्रेमी, प्राणिप्रेमी आणि विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करता येणार आहे. अशाच प्रकारचे पक्षिसंशोधन व निरीक्षण केंद्र तळजाई, पाषाण व शहरातील विविध टेकड्यांवर साकारण्याचे नियोजन आहे.

                          – अशोक घोरपडे, मुख्य अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

Back to top button