धुळे : विकासकामाच्या श्रेयवादावरुन खा. भामरे आणि आ. कुणाल पाटील यांच्यात जुंपली | पुढारी

धुळे : विकासकामाच्या श्रेयवादावरुन खा. भामरे आणि आ. कुणाल पाटील यांच्यात जुंपली

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ४२ कोटींच्या निधीतील विकास कामांची स्थगिती उठवण्याच्या प्रश्नावरून धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आमदार कुणाल पाटील यांच्यावर शरसंधान केले आहे. या निधी वरील स्थगिती आपण उठवली असून त्याचे श्रेय घेऊ नये असे सुनावले आहे. या संदर्भात राज्य सरकारकडे केलेल्या पत्र व्यवहाराच्या प्रती देखील खासदार भामरे यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा विकास कामांचा श्रेय घेण्याचा वाद ऐरणीवर आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. यात धुळे जिल्ह्यातील निधीचा देखील समावेश होता. मात्र गेल्याच आठवड्यात स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याचे स्पष्ट केले. पण आता भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आमदार कुणाल पाटील यांच्यावर श्रेय घेण्याच्या कारणावरून टीका केली आहे. या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने स्थगिती उठवण्यात आली असताना आ. कुणाल पाटील हे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खासदार भामरे यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घाई गडबडीत वाटलेल्या निधीवर स्थगिती आली होती. त्यामुळे लॅप्स होणारा निधी दुसरीकडे वळवला जाणार होता, तो जावू नये यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करुन हा ४२ कोटींचा निधी आणला आहे. म्हणून काँग्रेस आमदार कुणाल पाटलांनी उगाच फुकटचे श्रेय घेवू नये. असे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सुनावले आहे.

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार ९ महिन्यांपुर्वी कोसळणार असल्याची स्थिती असताना घाई गडबडीत महाविकास आघाडीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात आमदारांना निधीचे वाटप केले. मात्र राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप व शिवसेना युती सरकारने महाविकास आघाडीच्या घाई गडबडीत केलेल्या निधी वाटपावर सरसकट स्थगिती दिली. स्थगिती दिलेल्या निधीतच धुळे तालुक्यातील रस्त्यांसाठीचा ४२ कोटींचा निधी होता. हा निधी लॅप्स होण्याची किंवा दुसरीकडे वळवला जाण्याची शक्यता होती.

धुळे तालुक्यातील विकासावर याचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्वरीत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना पत्र दिले आणि विनंती केली की, धुळे तालुक्यातील रस्त्यासाठी असलेला ४२ कोटींचा निधी स्थगिती हटवून मंजूर करावा, अन्यथा तालुक्यातील विकास कामांवर परिणाम होईल, नुकसान होईल असा आग्रह केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत आपल्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करण्याचा रिमार्क केला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना सुचना दिल्या. त्यानंतर पुन्हा वेळोवेळी मी मंत्रालयात जावून पाठपुरावा करीत धुळे तालुक्यासाठीच्या निधीची स्थगिती उठवून पुन्हा तो निधी मंजूर करुन आणला. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांनी स्थगिती उठवल्याचे फुकटचे श्रेय घेवू नये, असे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा :

Back to top button