नाशिक : ‘भावी’ खासदार-आमदारांची पोस्टरबाजी | पुढारी

नाशिक : ‘भावी’ खासदार-आमदारांची पोस्टरबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतील, हे सांगणे अवघड असले, तरी त्याचे पडघम राजकारण्यांमध्ये आतापासूनच वाजायला लागले आहेत. आगामी निवडणुकीत इच्छुक असणार्‍यांकडून वाढदिवसांचे औचित्य साधत शहरातील विविध भागांत लावलेल्या पोस्टर्सवर स्वत:च्या नावापुढे ‘भावी खासदार’, ‘भावी आमदार’ असे लावले जात आहे. पोस्टर्सची ही शक्कल पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभावी वाटत असली, तरी मतदारांवर कितपत प्रभावी ठरेल हे प्रत्यक्ष मतदानामधूनच दिसून येईल.

सध्या शहरातील बहुतांश भागांत भावी खासदार, भावी आमदारांचे पोस्टर्स झळकत आहेत. राजकीय वर्तुळात हे पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील काही भागांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची छायाचित्रेही बॅनर्सवर झळकविण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या वर्षी पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांचेही ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेले पोस्टर्स नाशिकमध्ये लावण्यात आले होते. या पोस्टर्सवरून शिंदे गटात काही अंशी तणावही निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला होता. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जेव्हा मालेगावमध्ये सभा झाली होती, तेव्हादेखील अशाच स्वरूपाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचादेखील वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणुका केव्हा होतील, हा जरी प्रश्न असला, तरी नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून (बहुधा स्वत: नेत्यांनीच) पोस्टर्सवर ‘भावी खासदार, आमदार’ असा उल्लेख केला जात असल्याने सध्या शहरात ‘पोस्टर्स वॉर’ सुरू आहे की काय? अशी चर्चा यानिमित्त रंगत आहे.

खासदारकीसाठी ‘कोकाटे’ नावाची चर्चा
काही दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचे कौतुक करताना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाला पसंती दिली जाणार असल्याचे संकेत दिले होते. भुजबळ कुटुंबीयांव्यतिरिक्त कोकाटे यांचे नाव चर्चेत आल्याने त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला गेल्याने ‘कोकाटे’ नावाची चर्चा चांगलीच रंगत आहे. याशिवाय महाविकास आघाडीत नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button