नाशिक : तृतीयपंथीयांकडून हप्ता वसुली करणारे दोघे गजाआड | पुढारी

नाशिक : तृतीयपंथीयांकडून हप्ता वसुली करणारे दोघे गजाआड

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

रेल्वेच्या मेल एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना शस्त्राचा धाक दाखवून हप्ता वसुली करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलिस पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील एक संशयित फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे शहर व परिसरात गुंडांकडून दर हप्त्याला लाखोंची हप्ता वसुली होत असल्याचे आणि या वादातून खुनाच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे.

सुगंध परशुराम गायकवाड, (तृतीयपंथीय, ३८, रा. पत्रीपूल झोपडपट्टी, कल्याण पूर्व, जि. ठाणे) यांनी जिवे मारण्याची धमकी व हप्ता वसुलीबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित गुन्हेगार सूरज गोपीचंद भंडारी, गोपीचंद काशीनाथ भंडारी (दोघे रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक संशयित फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (दि. २५) इगतपुरी बस स्थानकाजवळील दर्गा परिसरात रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये भिक्षा मागणारे तृतीयपंथी बसलेले होते. यावेळी तीन युवक कोयता व धारदार शस्त्र घेऊन आले व प्रत्येक तृतीयपंथीयांकडून नेहमीप्रमाणे हप्तेवसुली करत होते. याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिस निरीक्षक राजू सुर्वे हा प्रकार लक्षात आला. मात्र शस्त्रधारी युवकांनी पळ काढला. पोलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत सूरज भंडारी, गोपीचंद भंडारी या दोन युवकांना ताब्यात घेतले. घटनेतील तृतीयपंथीयांची विचारपूस केली असता हप्ते वसुलीचा प्रकार समोर आला.

काही महिन्यांपूर्वी शहरात डेव्हिड गँग व भंडारी यांच्या हप्ता वसुलीच्या वादावरून शहरात दोन्ही गँगमधील दोन जणांचा खून झाला होता. या घटनेवरुन मागील काही गुन्ह्यांची कबुली देत दोन संशयितांनी सर्व माहिती पोलिसांना देताच तपासाला गती आल्याने शहरासह नांदगाव सदो येथील मोठी हप्ता वसुली टोळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.

तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

शस्त्र बाळगणारे व गुंडप्रवृत्तीचे लोक यांनी सर्वसामान्य जनतेला किंवा महिला, मुलींना नाहक त्रास दिला तर याबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे, संदीप शिंदे, पी. एस. खिल्लारी, नीलेश देवराज, पोलिस हवालदार मुकेश महिरे, सचिन देसले, सचिन मुकणे, अभिजित पोटिंदे, शरद साळवे, राहुल साळवे आदी करत आहेत.

कल्याण ते इगतपुरी रेल्वेगाड्यांमध्ये तृतीयपंथीय, खाद्यपदार्थ विक्री करणारे सुमारे ४०० हॉकर २४ तास धंदा करतात. या प्रत्येकांकडून ५०० रुपये हप्ता आठ दिवसाला जमा केला जातो. ही रक्कम लाखो रुपयांत जमा होते. याची वाटप प्रत्येक गुंड आपल्या धाक व दराराप्रमाणे ठरवतो. या कारणामुळे आपसात भांडण होऊन प्रकरण खुनापर्यंत पोहोचत आहे. म्हणून ही गुंडगिरी संपविणे शहराची गरज आहे.

  • राजू सुर्वे, पोलिस निरीक्षक, इगतपुरी

Back to top button