प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीला अवघ्या दोन वर्षात रामराम; भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत आज (दि.१२) भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक येथे भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रिया बेर्डे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. बेर्डे यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बेर्डे (Priya Berde)यांनी २०२० मध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अवघ्या दोन वर्षातच बेर्डे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बेर्डे यांच्यासह गिरीश परदेशी, दिग्दर्शक मधुरा जोशी, विद्या पोकळे, मनिषा मुंडे, वेदांत महाजन, दत्तात्रय जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेशानंतर प्रिया बेर्डे म्हणाल्या की, चार महिन्यांपूर्वीच मी राष्ट्रवादी पक्षाच्‍या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी कलाकारांसाठीच काम करत राहणार आहे. भाजपकडून दिलेली जबाबदारी पार पाडली जाईल. कलाकार, तंत्रज्ञ, नाट्यकलाकार, लोक कलावंत, तमाशा कलावंत यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे बेर्डे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button