सत्यजीत तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन, मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा | पुढारी

सत्यजीत तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन, मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

नाशिक : पुढारी ऑनलाइन –नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीने आज आपली भूमिका जाहीर केली आहे. नाशिकमध्ये मविआचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.  तसेच सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित  करण्‍यात आल्‍याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ( दि. १७)  संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली.

कॉंग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे जितेंद्र  आव्हाड व शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्‍या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केले.

यावेळी पटोले म्‍हणाले, नाशिकमध्ये कॉंग्रेसच्या विचारधारेवर सुधीर तांबेंना तीन वेळा पदवीधरांनी निवडून दिले. यावेळेलाही पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. तांबे कुटुंबाला आम्ही  काँग्रेसमधून निलंबित केले आहे. बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलू, त्याच्याकडून काही भूमिका आली तर ती आम्ही स्पष्ट करु, असेही पटोले यांनी स्‍पष्‍ट केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करुनही ऐनवेळी माघार घेतल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केली होती. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे केली होती. त्यानुसार कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीला दिल्या होत्‍या. आज प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी सत्‍यजीत तांबे यांच्‍या निलंबनाची औपचारिक घोषणा केली.

 

Back to top button