नाशिक : महावितरणमधील लाचखोर अभियंता गजाआड | पुढारी

नाशिक : महावितरणमधील लाचखोर अभियंता गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वीजमीटर, ट्रान्स्फाॅर्मर बसवण्याच्या कामास मंजुरी देण्याच्या मोबदल्यात १७ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणमधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. संजय मारुती धालपे (४४) असे या अभियंत्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचे बांधकाम सुरू असून, तेथे ४१ वीजमीटर व ट्रान्स्फाॅर्मर बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी महावितरणकडे संपर्क साधला. त्यावेळी द्वारका उपविभागात कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय धालपे यांनी तक्रारदाराकडे मीटर व ट्रान्स्फाॅर्मर बसवण्यासाठी शुक्रवारी (दि. २) २० हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोड करून तक्रारदाराने १७ हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. सोमवारी (दि. ५) तक्रारदाराकडून लाचेचे १७ हजार रुपये घेताना धालपे यास रंगेहाथ पकडण्यात आले. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, पोलिस नाईक प्रवीण महाजन, नितीन कराड, नितीन नेटारे, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button