नळ पाणीयोजना : आंबेवाडीसह 8 गावे होणार टंचाईमुक्त | पुढारी

नळ पाणीयोजना : आंबेवाडीसह 8 गावे होणार टंचाईमुक्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
जलजीवन मिशन योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आंबेवाडी व 8 गावे या नळ पाणीपुरवठा योजनेच्या 21 कोटी 83 लाख रुपयांच्या कामास कार्यारंभ आदेश मिळाले असून, महिनाभराच्या आत कामास सुरुवात होणार आहे. या योजनेस भाम धरणातून थेट पाणीपुरवठा होणार असल्याने सुमारे 25 हजार आदिवासी बांधवांची कायमस्वरूपी पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातील या योजनेत समाविष्ट गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी अनेकदा निधी मिळाला. तथापि पाण्याचे उद्भव शाश्वत नसल्याने जानेवारी महिन्यापासून या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. महिला दीड ते दोन किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करतात. पुरुष मोटारसायकल, बैलगाडी, ट्रॅॅक्टर यासारख्या वाहनांचा पाणी वाहण्यासाठी वापर करतात. आदिवासी बांधवांची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या धर्तीवर या गावांनाही थेट धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी भाम धरणातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी जलसंपदा विभागातून पाणी आरक्षण करून घेतले. जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांकडून तसा सर्व्हे करून घेतला. त्यानंतर प्रस्ताव तयार करून घेत ते मंत्रालयात सादर करण्यात आले. या प्रस्तावास यावर्षीच्या मे महिन्यात प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. आता ई- निविदा प्रक्रिया राबवून त्यासाठी पात्र ठरलेल्या मे.पी.पी. गोगड कंपनीस 21 कोटी 83 लाख रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आले आहेत.

या गावांना होणार फायदा….
आंबेवाडी, मांजरगाव, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा व आधारवड या गावांसह भामलेवाडी, धानोशी, ठोकळवाडी, घोडेवाडी, काननवाडी, कचरवाडी, राहुलनगर, भोईरवाडी व शिरेवाडी या वाड्यांना ही योजना पूर्ण होताच पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.

सौर ऊर्जेवर योजना चालणार…
9 गावे व त्या गावांच्या 9 वाड्या यांना सुमारे 30 किमीच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा होणार आहे. तथापि, भाम धरणातून पाणी मोटरपंपाद्वारे उचलून ते 8 किमी अंतरावर मांजरगाव येथे बांधण्यात येणार्‍या जलशुध्दीकरण केंद्रात सोडण्यात येणार आहे. पाणी उपसा व जलशुध्दीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागणार आहे. त्यासाठी आमदार कोकाटे यांच्या सूचनेवरून या योजनेत सौर ऊर्जा संचाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या आर्थिक बोजातून ही योजना वाचणार आहे.

धरणांचा तालुका असूनही वर्षातील 6 महिने पाण्यासाठी हाल सोसणार्‍या आदिवासी बांधवांची यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी शाश्वत स्त्रोत महत्त्वाचा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भाम धरणातून योजनेच्या पाण्याचा उद्भव मंजूर करून घेतला. ही योजना स्वयंचलित असणार आहे. आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी पाणी मिळेल. – माणिकराव कोकाटे, आमदार.

हेही वाचा:

Back to top button