कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : आमदार रोहित पवार | पुढारी

कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार : आमदार रोहित पवार

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कारखाना अगोदर चालू केला म्हणून आमदार राम शिंदे यांनी माझ्या विरोधात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. शेतकरी, जनता व कार्यकर्त्यांच्या पाठिंबामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील दत्तराज दूध संकलन केंद्राचे प्रमुख दीपक भागडे यांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांना आ.पवार यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त लाभांश वाटप केले. यावेळी बाळासाहेब सपकाळ, रघुनाथ काळदाते, ढोबे सर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी आ. शिंदे यांच्यावर टीका करताना आ.पवार म्हणाले, माझ्या विरोधात तक्रार करण्यासाठी कारखाना सुरू नसताना देखील त्या ठिकाणी जाऊन फोटो काढून वृत्तपत्रांमधून बातम्या दिल्या. साखर आयुक्त यांनी क्लिन चिट दिली. हे सहन झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारखान्यावर कारवाई कराच, असा आग्रह धरला, निवेदन दिले. चौकशीसाठी मी तयार आहे. मात्र, आज शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

आ.शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी केली असती तर समाधान वाटले असते. मात्र, ज्यांना शेतकर्‍यांविषयी काही घेणेदेणे नाही, केवळ विरोधासाठी विरोध म्हणून राजकारण करावयाचे आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणे चूक आहे, असे आ. पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरीप पिके वाया गेली आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना भागडे यांनी लाभांशाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे, असे आ. पवार म्हणाले.

Back to top button