नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात | पुढारी

नाशिक : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपंढरी धोक्यात

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात गेल्या दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. लाखो रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली बाग वाया जाते की काय, असे चिंतेचे ढग शेतकर्‍यांच्या मनात घर करत आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वत्र मका, सोयाबीन, कांदा रोपे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः तालुक्याचे नगदी पीक असलेल्या कांद्यालाही फटका बसला आहे. चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, तो खराब झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फिरले. त्यामुळे शेतकरी अस्मानी-सुलतानी आर्थिक संकटात भरडला गेला आहे. एकेकाळी डाळिंब शेतीसाठी नावाजलेल्या वाजगाव शिवारात तेल्या रोगाने थैमान घातले. डाळिंब सोडून याठिकाणी आता द्राक्षलागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणामुळे लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागा खराब होऊन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वाजगाव परिसरात सध्या द्राक्षबागांचे थिनिंग सुरू आहे. मात्र, दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्चून बागा जगावल्या. बदलत्या वातावरणाचा फटका बसू नये म्हणून उपाय शोधत आहेत. निसर्गाने साथ दिली नाही, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. शासनाने ठोस पावले न उचलल्यास शेतकरी देशोधडीला लागेल. तेव्हा हमीभाव देऊन शेतकर्‍यांना अनिश्चित बाजाराच्या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी होेत आहे. बाजरी, मका, सोयाबीन काढणी सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली.

दोन एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग आज 45 दिवसांची झाली आहे. आतापर्यंत दोन लाख रुपये झाला असून, अजून काही दिवस खर्च होणार आहे. बागेची निगा राखण्यासाठी घरातील सर्व सदस्य मेहनत घेत आहेत. पण पुढे काय होईल, याची शाश्वती नाही. वातावरणातील सततच्या बदलामुळे बाग धोक्याची वाटू लागली आहे. – प्रमोद देवरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वाजगाव.

हेही वाचा:

Back to top button