सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता हॅम पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग विकसनाच्या विषयास विरोध करण्याचा निर्णय भाजप नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील रस्ते विकासासाठी हॅम ऐवजी शासन निधीसाठी प्रयत्न करण्याचा मार्ग अवलंबण्याचे ठरले. दरम्यान, मोक्याच्या जागेवर खासगी भागीदारीतून घरांची निर्मिती योजनेच्या विषयावरही बोट ठेवले आहे. महासभेत हा विषयही बाजूला पडण्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिकेची महासभा बुधवारी (दि. 19) होत आहे. महासभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेत भाजपची पार्टी मिटींग झाली. सभागृह नेत्या भारती दिगडे, ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होतेे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्ग (शंभर फुटी रस्ता) हॅम पद्धतीने विकसित करण्याचा विषय महासभेच्या अजेंड्यावर आहे. या रस्त्याच्या 76 कोटींच्या कामासाठी ई-महाटेंडर पद्धतीने निविदा मागविण्यास व खर्चास मान्यतेचा विषय महासभेपुढे आहे. भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये यावर चर्चा झाली. हॅम पद्धतीने रस्ता विकसित करताना रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 60 टक्के व उर्वरित 40 टक्के रक्कम दहा वर्षात व्याजासह महापालिकेला द्यावी लागणार आहे. सांगलीतील या रस्त्याबरोबरच मिरज आणि कुपवाडमधील रस्त्याचेही हॅम पद्धतीने विकसन करावे लागेल. रस्ते विकसनाची रक्कम देणे महापालिकेच्या आर्थिक कुवतीबाहेर आहे. त्यामुळे हा विषय रद्द करून तीनही शहरातील रस्ते विकासासाठी शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव करू. या रस्ते कामांसाठी शासनाकडून निधी आणू, असा पवित्रा भाजपने पार्टी मिटींगमध्ये घेतला.
सांगली शहरातील सर्वे क्रमांक 269 (नवीन सर्वे क्रमांक 180) व मिरज शहरातील सर्वे क्रमांक 6, 7 आणि 181 (नवीन सर्वे क्रमांक 133) या महापालिकेच्या भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत खासगी भागीदारीद्वारे परवडणार्या घरांची निर्मिती योजना राबविणे आणि जागेवरील आरक्षण फेरबदल करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्याचा विषय महासभेपुढे आला आहे. मोक्याच्या जागेवर खासगी भागीदारीतून 64 घरांच्या निर्मितीमध्ये कोणाकोणाचे भले होणार आहे हे पहा, असा मुद्दा भाजप पार्टी मिटींगमध्ये उपस्थित झाला. या विषयाविरोधातही सूर उमटले.
सांगली शहर, सांगलीवाडी, कृष्णाघाट मिरज येतील पूरबाधित आपत्तीग्रस्त बेघर नागरिकांसाठी कायमस्वरुपी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सांगली-मिरज रोडवरील चंदनवाडी परिसरातील जमीन भूसंपादन एनडीआरफ व एसडीआरएफ निधीमधून प्राप्त होणार्या 20 टक्के निधीअंतर्गत खरेदीसाठी निधी प्राप्त होण्यास प्रस्ताव सादर करण्यास मान्यतेचा विषय महासभेपुढे आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी सुमारे 65 कोटी रुपये लागणार आहेत. इमारत बांधकामासाठी निधी उपलब्धता कोठून होणार, याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय भाजप पार्टी मिटींगमध्ये झाला.
माळबंगला जलशुद्धीकरण केंद्र मुख्य संतुलन टाकीपासून यशवंतनगर पंपहाऊस संपपर्यंत मेन पाईप टाकण्याच्या 1.36 कोटींच्या कामास शिफारशीचा विषय महासभेपुढे आला आहे. दरम्यान, हा विषय मंजूर करण्याऐवजी महापालिका क्षेत्रात पाईपलाईन बदलण्याची गरज असलेल्या सर्व कामांचे प्रस्ताव एकत्रित करून विषय महासभेपुढे आणण्याची मागणी भाजपकडून होणार आहे.
महासभेपुढे आलेल्या विषयांची नीट माहिती खातेप्रमुखांना नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशापद्धतीने प्रशासकीय कारभार योग्य नाही. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर महापालिकेचे सर्व खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांची बैठक बोलवली जाणार आहे, अशी माहिती सभागृह नेत्या भारती दिगडे यांनी दिली. सांगली, कुपवाडमधील गॅसदाहिनी / डिझेलदाहिनी बंद असल्यावरून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.