नाशिक : भुजबळ यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; लासलगाव ते विंचूर रस्ता दुरुस्तीचा केवळ देखावा!

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

लासलगाव ते विंचूर या 5 किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मतदारसंघाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव शहरात या संदर्भात आढावा बैठकीत अधिकार्‍यांना सूचना देऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या करण्याचे सूचना दिल्या होत्या. मात्र, भुजबळांची पाठ फिरल्यानंतर अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा करत भुजबळांच्या आदेशाला एक प्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे आता नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

लासलगाव शहरापासून नाशिक-औरंगाबाद महामार्गाकडे जाणार्‍या विंचूर येथे जाण्यासाठी 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो. मात्र, हा 5 किलोमीटरचा प्रवास अनेकांच्या जिवावर बेतत आहे. या रस्त्यावरील मंजुळा मंगल कार्यालयात समोर असलेल्या वळणावर दर आठवड्याला एक ते दोन अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. अपघातांमध्ये सर्वांत जास्त दुचाकीचे प्रमाण अधिक आहे.

भुजबळ यांनी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या संदर्भात सूचना करून तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या भरण्याचे सूचना केल्या होत्या. ठिकठिकाणी फलक लावण्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी अधिकार्‍यांनी देखील तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तत्परता दाखवत रस्त्याच्या बाजूची वाढलेली झाडे व गवत काढून थोडाफार रस्ता सुधरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही अपघात घडण्याचे प्रमाण जैसे थे आहे. त्यामुळे केवळ रस्ता दुरुस्तीचा देखावा न करता तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या भरून रस्ता मोठा करण्याची गरज असल्याचे मत अनेक त्रस्त वाहनचालक करत आहेत.

पोलिसांनी फलक केला मोकळा

विंचूर रस्त्यावर अपघात नेहमीचेच झाल्याने सर्वांत जास्त डोकेदुखी पोलिसांसाठी ठरत असल्याने पोलिस प्रशासनदेखील हतबल झाले आहे. यापूर्वी वळण रस्त्याजवळ रेडियम फलक या ठिकाणी लावलेले होते. मात्र, त्यावर झाडांचा वेल मोठ्या प्रमाणात वाढल्याने तो फलक झाकला गेला होता. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलिसांनी या ठिकाणी जात तो वेल काढून एकमेव फलक मोकळा केला.

लासलगाव विंचूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने या रस्त्यावर फलक लावून जनजागृती करणे गरजेचे आहे मंजुळा मंगल कार्यालयाच्या बाहेर वळण रस्ता असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून वाहनचालकांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा :

Exit mobile version