नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर | पुढारी

नाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात सध्या ५० टक्क्यांहून अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील गळती कमी करण्यासाठी महावितरण ॲक्शन मोडवर आले आहे. महावितरणच्या १६ परिमंडळांतील २३० हून अधिक वाहिन्यांवर वीजचोरांविराेधात धडक कारवाई, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टीमीटर बॉक्स व कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्याने महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दिष्ट वीजहानी कमी करणे आहे. त्या अनुषंगाने महावितरणने यापूर्वी राबविलेला पुनर्रचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांआधारे लाभान्वित असलेल्या शहरांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील गळती कमी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिली. जुनी पायाभूत सुविधा व उपकरणे, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, वीजभाराचे असंतुलन, उपकेंद्रांपासून दूर अंतरावर वितरण रोहित्र उभारणे, अतिभारित वीजवाहिन्या आणि कमी दाबाचा वीजपुरवठा अशी विविध कारणे तांत्रिक हानी वाढण्यास कारणीभूत आहेत. ही हानी कमी करण्यासाठी जुन्या वीजवाहिन्या व केबल बदलणे, उच्चदाब वितरण प्रणालीचा वापर, वीजवाहिन्यांचे विलगीकरण करणे, वितरण रोहित्रावरील प्रतिक्रियाशील ऊर्जा (रिॲक्टिव्ह पॉवर) नियंत्रित करणे आणि उच्च दर्जाचे वितरण रोहित्र वापरून तांत्रिक हानी कमी करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेतून साध्य करण्यावर महावितरणचा भर असणार आहे.

वाणिज्यिक हानी कमी करणार :

वीजवाहिन्यांवर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, गुणक अवयव चुकीचे असणे आणि वीजबिलांमधील समस्या ही कारणे वाणिज्यिक हानी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी नादुरुस्त मीटर तातडीने बदलताना मीटर रीडिंग अचूक राहील, याची दक्षता घेण्यात येईल, असे विजय सिंघल यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button