बारावी परीक्षेत नाशिक जिल्ह्याचा 92.65 टक्के निकाल, पहा तालुकानिहाय निकाल | पुढारी

बारावी परीक्षेत नाशिक जिल्ह्याचा 92.65 टक्के निकाल, पहा तालुकानिहाय निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रकोपानंतर यंदा प्रथमच मार्च-एप्रिल 2022 मध्ये ऑफलाइन पद्धतीने इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.8) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात मुलींचेच वर्चस्व दिसून आले आहे. नाशिक विभागात उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी 96.17 इतकी, तर विद्यार्थ्यांची टक्केवारी 96.17 टक्के इतकी आहे.

इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी नाशिक विभागातून 1 लाख 61 हजार 539 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 70 हजार 326 मुलींचा, तर 91 हजार 213 मुलांचा समावेश होता. विभागात 1 लाख 52 हजार 629 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 67 हजार 255 मुलींचा, तर 85 हजार 374 मुलांचा समावेश आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 2.03 टक्क्यांनी जास्त आहे. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल 92.65 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी 74, 774 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 74,057 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले होते. 68 हजार 616 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कळवण तालुक्याचा सर्वाधिक 98.55 टक्के, तर नाशिक तालुक्याचा सर्वांत कमी 90.57 टक्के इतका निकाल लागला आहे. कळवण तालुक्यातून 2,568 परीक्षार्थींपैकी 2,531 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक तालुक्यातील 3,086 पैकी 2,795 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. दरम्यान, विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात नाशिक जिल्ह्यात विज्ञान, कला, वाणिज्य आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा टक्का घटला आहे. कोरोनानंतर घेण्यात आलेल्या ऑफलाइन परीक्षेचा परिणाम निकालावर झाला आहे. यंदा विज्ञान शाखेेचा निकाल 98.36 टक्के लागला. वाणिज्य शाखेचा 91.66, कला शाखेचा निकाल 89.56 तर उच्च माध्यमिक व्यवसाय शाखेचा 86.85 टक्के इतका निकाल लागला आहे. शाखांच्या निकालात घसरण झाली असली तरी प्रथम वर्ष प्रवेशासाठी मोठी स्पर्धा राहणार आहे.

तालुकानिहाय…

इगतपुरी 95.87, सिन्नर 93.00, नाशिक 90.57, निफाड 94.63, येवला 96.78, चांदवड 91.50, नांदगाव 95.55, दिंडोरी 93.93, त्र्यंबक 96.30, पेठ 94.80, सुरगाणा 96.73, कळवण 98.55, सटाणा 94.35, मालेगाव 96.94, देवळा 97.46

शाखा निहाय..

विज्ञान- 98.75, कला-91.27, वाणिज्य-93.84, एमसीव्हीसी-90.77

विभागात 62.44 टक्के पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
ऑफलाइन परीक्षेचा पुनर्परीक्षार्थींना मोठा फटका बसला आहे. या निकालात पुनर्परीक्षार्थींची लक्षणीय घसरण झाली आहे. विभागाचा निकाल अवघा 62.44 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी 3,423 पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3,419 पुनर्परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले होते. 2,135 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये मुलींची संख्या 519 तर मुलांची संख्या 1,616 इतकी आहे.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
विद्यार्थ्यांसह पालकांनी सायबर कॅफे आणि स्वत:च्या मोबाइलवरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा निकाल बघणे पसंत केले होते. शाळा-महाविद्यालयांसह ठिकठिकाणी निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी लगबग दिसून येत होती. मोबाइलवर संदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकालाची माहिती उपलब्ध होत होती. निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी एकमेकांना भेटून व सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली होती. या परिस्थितीतही त्यांनी आयुष्यातील महत्त्वाची बारावी बोर्डाची परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने दिली. त्यामुळेच मागील वर्षाच्या तुलनेने चांगला निकाल आला. तसेच या विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. बोर्डाने दिलेल्या वाढीव वेळेचा फायदा विद्यार्थ्यांना झाला.
– प्रा. सीए लोकेश पारख, सरचिटणीस,
जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना

विद्यार्थ्यांचे
समुपदेशन…
इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण मंडळाकडून ऑनलाइन समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 दूरध्वनी क्रमांक देण्यात आले असूून, हे समुपदेशन मोफत राहणार आहे. दरम्यान, नापास विद्यार्थ्यांच्या पालकांचीही समजूत काढण्यात येणार आहे.

Back to top button