सातारा : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी | पुढारी

सातारा : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : थोड्याच दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू होत आहेत. दि. 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षातील वर्ग भरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक साहित्य विक्री करणारी दुकाने गर्दीने हाऊसफुल्ल होत आहेत. दरम्यान, शैक्षणिक साहित्याच्या किंमतीमध्ये सुमारे 30 ते 35 टक्क्यांनी दरवाढ झाल्याने पालकांच्या खिशाला चांगलीच आर्थिक झळ बसत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये शाळा सुरु होते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी दि. 13 जून रोजी शाळा सुरु होत असल्याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ लवकरच होणार आहे. शाळा सुरु होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालकांबरोबरच शिक्षकांचीही धांदल उडाली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पुस्तके मिळत असली तरी त्यावरील वर्गातील विद्यार्थी तसेच खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घ्यावी लागतात. त्याचबरोबर व्यावसाय पुस्तिका, वह्या, कव्हर रोल, पेन, पेनस्लि बॉक्स, रफ पेपर, कार्यानुभवचे साहित्य, चित्रकला वही, स्कूल बॅग, टीफीनबॉक्स आदि साहित्य सर्रास खरेदी केले जात आहे. शिक्षकांकडूनही वार्षिक टाचन वह्या, रजिस्टर, विविध तक्‍ते खरेदी केले जात आहेत. सातारा शहर व परिसरातील शैक्षणिक साहित्य विक्री करणारी दुकाने ग्राहकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहेत. वाढत्या महागाईच्या झळा या शैक्षणिक साहित्यालाही बसत असून वह्यांसह सर्वच शैक्षणिक साहित्याच्या किंमतींमध्ये सुमारे 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.

विक्रेत्यांकडून जादा कामगारांची नेमणूक…

मागील दोन वर्षे शैक्षणिक वर्षे ऑनलाईन सुरू झाले होते. त्यामुळे डबा, दप्‍तर, गणवेश, रेनकोट, बूट आदी साहित्याची खरेदीच करावी लागली नाही. मात्र, यावर्षी साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना गर्दीमुळे बराच वेळ रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. अनेक व्यावसायिकांनी हंगामी कामगारांची कुमक वाढवली आहे. ज्यादा कामगारांची नेमणूक करुन गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जात आहे.

वाढत्या महागाईच्या झळा शैक्षणिक साहित्यालाही बसत आहेत. कच्चा मालाचे दर व इंधन दरवाढीमुळे शैक्षणिक साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत.
– विकास शेंडे,
शैक्षणिक साहित्य विक्रेते

Back to top button