सण-उत्सवांना फुटली चैत्रपालवी | पुढारी

सण-उत्सवांना फुटली चैत्रपालवी

नाशिक : चंद्रमणी पटाईत

चैत्राच्या महिन्यात डोक्यावर आलेला सूर्य जेवढी आग ओकतो, त्यातून जिवाची जेवढी काहिली होते, ती शब्दातित असते. मात्र, उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी जशी माणसं शीतपेयं, गारव्याची जागा शोधतात, तशीच मनाचीही झालेली काहिली आपण साधारण अडीच वर्षांपासून पाहतोच आहोत. त्याचं कारण सर्वश्रुत आहे, ते म्हणजे कोरोना. या महामारीतून आताशा कुठं श्वास मोकळा होऊ पाहात आहे. निर्बंधांच्या जोखडांमधून बाहेर येऊ लागलो आहोत. त्यामुळे होणारे सर्व सण-उत्सव मोठ्या आनंदात, जल्लोषात आणि नव्या दमानं ‘ब्रेक के बाद’ साजरे होत आहेत. मनाची झालेली काहिली शमवण्यासाठी सण-उत्सव जणू चैत्रात बहरलेल्या आंब्याच्या झाडांवर फुललेला मोहोर, चैत्रात येणार्‍या गारवादायी पालवीसारखेच हर्षोल्हासात अन् दिमाखात साजरे होताना पाहून शीणभाग दूर होत आहे. समाज पुन्हा चार भिंतींतून बाहेर पडू लागला आहे. एकमेकाच्या सुख-दु:खात आणि सण-उत्सवात सामील होतानाचं पूर्वीसारखं द़ृश्य दिसू लागलं आहे. त्यामुळे गुण्यागोविंदानं नांदणारी जनता पाहून, संवेदनशील मन भावनिक होऊ लागलं असून, सांस्कृतिक भूक भगविणारे आणि एकोपा निर्माण करणारे दिवस मात्र, नव्याने आले आहेत, हे निश्चित.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. कितीही ठरवलं, तरी माणूस एकटा राहूच शकत नाही. अपवाद असू शकेल मात्र, त्यालाही कोणत्या का निमित्ताने होईना, लोकांमध्ये मिसळावंच लागतं. जावंच लागतं. भले तो स्वत:हून जाओ अथवा नाईलाजानं. यामुळे समाज आणि जगणं या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महामारी अचानक आली आणि दोन-अडीच वर्षं पाहुणी म्हणून राहिली. तिला हाकलताना आरोग्य प्रशासनाची जेवढी दमछाक होतेय, तेवढीच सर्वसामान्यांचीही. पाहुणा दोन दिवसांचा शोभून दिसतो, तशी महामारीही तितकाच काळ राहण्याची अपेक्षा होती. मात्र, तसं न होता, महामारी काही जायचं नावच घेईना. अखेर निर्बंधांचा उतारा जनमानसांवर लादला गेला. चार भिंतीत कोंडून घ्यावं लागलं. प्रसंगी त्यातून बाहेर यावंच लागलं, तर पोलिसांचे दंडुकेही पार्श्वभागावर वळ उमटेपर्यंत खावे लागले. अनेकांनी यात जिवाभावाची माणसं, घरातली कर्ती मंडळी, आप्तेष्ट, मित्रमंडळी गमावली, शेती, रोजगार, व्यापार, शिक्षण आदींसह सर्वच क्षेत्रं या महामारीनं प्रभावित झाली. यावरही मात करत आताशा कुठे सर्वकाही आलबेल होऊ लागलं आहे. महामारीवर ‘डोस’चा माराही केला आहे. सरकारी निर्बंधांमधून मुक्तही केलं जात आहे. त्यामुळे माणूस माणसांत येतो आहे, एकमेकांत उठू-बसू लागला आहे. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत आहे. दुरावलेले जवळ येऊ लागले आहेत. कुटुंबीय, नातेवाइकांच्या भेटीगाठी होऊ लागल्या आहेत, ही बाब सुखकारक ठरू पाहात आहे.

असो, सद्यस्थितीत कोरोना गपगार होत असल्याचं चित्र दिसत असल्यानं सर्वच सण-उत्सवही मोठ्या आनंदानं साजरे केले जात आहेत. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, धार्मिक, सांस्कृतिक सोहळे पार पडू लागले आहेत. त्यामुळे मनोरंजन, प्रबोधन आणि समाज एकत्र आणणारे कार्यक्रम होत आहेत. अनेक दिवसांपासून खंडित झालेल्या प्रथा नव्या दमानं सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चैत्रात जशी झाडांना नवी पालवी फुटते, तशी समाजमनाची पालवीही हिरवाई आणि गारवा देणारी दिसू लागली आहे. तरुणाईही मुक्तपणे कार्यक्रमांच्या आयोजनात हिरिरीनं सहभागी होऊ लागली आहे. आपल्या प्रथा, परंपरा जोपासण्यासाठी पुढे येऊ लागली आहे.

आगामी वर्षांत निवडणुकीचे वारेही येऊन धडकणार आहे. त्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंगही बांधलं आहे. त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचता येणार्‍या कार्यक्रमांचं आयोजनही केलं जात आहे. जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करण्याचा खटाटोपही अनेकांकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर फुटणारे फटाके आताच काही जणांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून फोडले जाऊ लागले आहेत. राजकारण म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप आलेच. मात्र, सध्याच्या स्थितीत राज्यातील नेत्यांचा एकमेकांवरील आरोपांचा धुरळा पाहून सामाजिक एकोपा फोडण्याचा त्यांचाच तर प्रयत्न नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. राजकारणासाठी दंगली घडवण्याचं षडयंत्र तर रचलं जात नाही ना, असा प्रश्नही पडू लागला आहे. धार्मिक, सांस्कृतिक एकता खंडित करण्याचा डाव तर आखला जात नाही ना, अशी स्थिती दिसू लागली आहे. त्यामुळे आता कुठे ट्रॅकवर आलेली समाजाची गाडी रुळावरून घसरणार तर नाही ना, याचा ठाव घेणं अवघड झालं आहे. कारण दीर्घ काळानंतर सर्वच क्षेत्रांमध्ये सुरळीतपणा आलेला आहे. सण-उत्सव सुरू झालेले आहेत. भाकरीचा चंद्र शोधण्याची कसरत कमी झालेली आहे. असं सारं काही सुखा-समाधानाचं चित्र असताना, उगीच कोणी तरी माथी भडकावणारी वक्तव्यं करून शांततेला हानी पोहोचवू पाहात असेल, तर जनतेनंच त्यांना धडा शिकवला पाहिजे. आपली शांतता अबाधित राहील, याची काळजी घेतली पाहिजे. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिलं पाहिजे. भेदाभेद अंमळ ठरवलं पाहिजे, तरच सण-उत्सवांना आता फुटलेल्या पालवीला रसदार फळं येतील अन्यथा…

 

Back to top button