मालदीवची घमेंड उतरली, भाषाही बदलली.!पर्यटनासाठी भारतीयांना आर्जव | पुढारी

मालदीवची घमेंड उतरली, भाषाही बदलली.!पर्यटनासाठी भारतीयांना आर्जव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनशी सलगी वाढवत भारताविरोधात भूमिका घेणार्‍या मालदीवच्‍या नवीन सरकारची काही महिन्‍यात भाषा बदलली आहे. मालदीव आणि भारत यांच्‍यातील ऐतिहासिक संबंधांचा दाखल देत भारतीयांना पर्यटनासाठी मालदीवमध्‍ये येवून आमच्‍या अर्थव्‍यवस्‍थेत योगदान द्यावे, असे आवाहन या देशाचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी ‘पीटीआय’शी बोलताना केले आहे.

आम्‍ही भारतीयांचे जोरदार स्‍वागत करु…

‘पीटीआय’ला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये इब्राहिम फैसल म्‍हणाले की, “आमच्‍या नवीन सरकारला भारताबरोबर काम करायचे आहे. आम्ही नेहमी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरणाला प्राधान्य देतो. आमचे लोक आणि सरकार भारतीयांचे मालदीवमध्ये जोरदार स्वागत करतील. पर्यटन मंत्री या नात्याने मला भारतीयांना सांगायचे आहे की, कृपया मालदीवच्या पर्यटनाचा एक भाग व्हा. आमची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.”

PM मोदींच्‍या पोस्‍टवर मालदीवकडून अपमानास्पद टिप्पणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जानेवारी रोजी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X हँडलवर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन लक्षद्वीप बेटांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. भारतातील लक्षद्वीप बेटाला पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्‍यांनी यामाध्‍यमातून केले होते. मात्र मालदीवने याचा चुकीचा अर्थ काढला. मालदीवच्या तीन अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. याची गंभीर दखल घेत  सेलिब्रेटींसह अनेक भारतीयांनी मालदीव सहल रद्द केली होती.

भारतीय पर्यटकांची मालदीवकडे पाठ, पर्यटकांच्‍या संख्‍येत ४२ टक्‍क्‍यांनी घट!

जानेवारीपर्यंत मालदीव हे भारतीयांसाठी सर्वाधिक आवडत्‍या पर्यटन केंद्रांपैकी एक होते. मात्र जानेवारीत मालदीवमधील राजकीय नेत्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर आपेक्षार्ह टिपण्‍णी केली. याचा मोठी किंमत या देशाला मोजावी लागली आहे. आता भारतीय पर्यटकांसाठी मालदीव हे सहाव्‍या क्रमांकाची पसंती आहे. सोमवार ६ मे रोजी प्रकाशित झालेल्या sun.mv च्या अहवालानुसार, “गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीस मालदीवसाठी भारत हा क्रमांक एकच पर्यटन देणारा देश होता. आता तो सहाव्या स्थानावर घसरला आहे.”

पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांची संख्‍या 73,785 इतकी होती. यावर्षी ही संख्या केवळ 42,638 इतकी आहे.

राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांची चीनशी सलगी

मालदीवमध्‍ये  नोव्हेंबर २०२३ मध्‍ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार सत्तेत आले. चीन समर्थक नेता, अशी मुइझ्झू यांची ओळख आहे. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्‍यांनी भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना देश सोडण्‍याचे आदेश दिले. तसेच मुइझ्झू यांनी भारताने मालदीवला भेट दिलेल्या तीन विमानचालन प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन करणाऱ्या 88 भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना माघार घेण्यास भाग पाडले. यापूर्वी भारतावर मालदीवच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोपही त्यांनी वारंवार केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button