नाशिक : ग्रामदैवत भैरवनाथाची उद्या यात्रा | पुढारी

नाशिक : ग्रामदैवत भैरवनाथाची उद्या यात्रा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा शुक्रवारी (दि. 15) होणार असून, सकाळी 6 वाजता मंदिरातून आरती व पूजेनंतर रथयात्रा सुरू होणार आहे.

वै. त्र्यंबक बाबा भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या यात्रांच्या परिपाठानुसार यात्रोत्सव होणार आहे. परिसरातील शेतकरी बैल रथाला जोडण्यासाठी घेऊन येतात. त्र्यंबकबाबा यांचे वारसदार विलास महाराज भगत यांच्या नेतृत्वाखालील भजनी मंडळाच्या तालासुरात यात्रा शहरातून निघते. रथाचे औक्षण करून, नारळ वाहून दर्शन घेण्यासाठी, भाविकांची झुंबड उडते. रथाच्या बैलजोड्या बदलून जास्तीत जास्त बैलजोड्यांना रथ ओढण्याचा मान दिला जातो. रथाच्या मागे शेकडो आबालवृद्ध कावडी घेऊन सहभागी होतात. सूर्यास्तानंतर रथ मंदिरात परततो. दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. मंदिर परिसरात विविध खेळणी विक्रेते रहाट पाळण्यासह मनोरंजनाची साधने खाद्यपेयांची दुकाने, असा यात्रा उत्सव शिगेला पोहोचतो. यात्रा उत्सव शांततेने पार पडावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने मधुकर भगत, विलास महाराज भगत, कृष्णाजी भगत, चिंतामण भगत व नाशिक वेस मित्रमंडळाने केले आहे.

तमाशा, कुस्त्यांची दंगल
रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. यानंतर शुक्रवारी रात्री दत्ता तांबे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे. गुरुवारी (दि. 14) रात्री मूर्ती अभिषेक व पूजन करण्यात येणार असून, तेव्हापासूनच यात्रेचा प्रारंभ होतो. शनिवारी (दि. 16) सायंकाळी बारद्वारीतील शेतात कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यात विजेत्या पहिलवानांना पारितोषिके देण्यात येईल.

हेही वाचा:

Back to top button