बारामती : ‘विठू माऊली गृह उद्योग’ वर अखेर गुन्हा दाखल

बारामती : ‘विठू माऊली गृह उद्योग’ वर अखेर गुन्हा दाखल
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

'विठू माऊली गृह उद्योग' या संस्थेने मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मदत करावी, अशी मागणी गेली अडीच वर्ष महिला करत होत्या. अखेर बुधवारी (दि. १३) वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात 'विठू माऊली'चा मास्टरमाईंड अशोक उर्फ राजन भिसे व एजंट अभिजित डोंगरे यांच्यासह एकूण सहा जणांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच महिलेची ७ लाख ३७ हजारांची फसवणूक झाल्याचे या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले आहे.

अशोक उर्फ राजन मानसिंग भिसे, सविता अशोक भिसे, गजराबाई मानसिंग भिसे (मूळ रा. धुमाळवाडी, पणदरे, ता. बारामती), मंगल लकडे (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), मिरा उर्फ सोनाली रमेश सागर (रा. शिवनेरी चाळ, सिध्दार्थनगर, घाटकोपर (प) मुंबई, व अभिजित डोंगरे (रा. करंजेपुल, ता.बारामती) यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

परस्पर माल पळवून गुंडाळला गाशा

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ३० ऑक्टोबर २०१८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीनुसार लघुद्योगाच्या माध्यमातून मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक व उत्पादन केल्यास जादा परतावा, नफा तसेच अतिरिक्त कमिशनचे अमिष आरोपींनी दाखवले. तसेच अधिकची रक्कम देण्याचे अमिष दाखवत व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल ठेवण्यासाठी गोडावून घेण्यास भाग पाडले. फिर्यादीकडून सुरुवातीला ३ लाख ५० हजार रुपये, त्यानंतर १ लाख ५० हजार रुपये तर फिर्यादीची मुलगी गौरी यांच्याकडून १ लाख ४ हजार रुपये घेण्यात आले. तयार झालेला १ लाख ३३ हजारांचा माल परस्पर नेण्यात आला. आणि सप्टेंबर २०१९ पासून भिसे याने कार्यालय बंद करत गाशा गुंडाळला. यात एकूण ७ लाख ३७ हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोणंद (ता. खंडाळा जि. सातारा) येथील 'विठू माऊली' या संस्थेने बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेकडो महिलांची फसवणूक केली आहे. संस्थेचा प्रमुख राजन भिसे व त्याचा एजंट अभिजित डोंगरे यांनी महिलांना 'कच्चा माल देतो मेणबत्त्या बनवून द्या' असे आमिष दाखविले. मेणबत्ती निर्मितीचा साचा, प्रशिक्षण, कच्चा माल देऊ करत महिलांकडून प्रत्येकी १० ते १४ हजार रूपये उकळले. ज्या महिलांकडे रोख रक्कम नव्हती त्यांना एका मल्टीस्टेट बँकेचे २० हजारांचे कर्ज मिळवून दिले. सुरवातीला काहींचा माल उचलला आणि नंतर गायब झाले.

महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या; मात्र कागदोपत्री पुरावे उपलब्ध न झाल्याने गेली अडीच वर्ष या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही. दरम्यान, वैशाली अरूण जगताप (रा. निंबुत, ता. बारामती) यांनी मात्र चिकाटीने पाठपुरावा करत कागदोपत्री पुरावे सादर केले आणि पोलिसांना या फसवणुकीच्या प्रकरणाची दखल घ्यायला भाग पाडले. त्यामुळे अशोक भिसे, सविता अशोक भिसे, गजराबाई मानसिंग भिसे, मंगल लकडे, सोनाली रमेश सागर व अभिजित डोंगरे यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी पहिला गुन्हा दाखल केला.

व्याप्ती वाढणार

बारामतीच्या पश्चिम भागातील अनेक महिलांची या प्रकरणात मोठी फसवणूक झाली आहे. व्यवसायासाठी ज्या संस्थेचे कर्ज मिळवून देण्यात आले होते. त्यांनीही वसूलीचा ससेमिरा लावत या महिलांना मोठी अपमानास्पद वागणूक दिली. पैसेही वसूल केले. अनेक महिला या व्यवसायाच्या निमित्ताने फसवणूकीला बळी पडल्या. पोलिसांनी आता पहिला गुन्हा दाखल केल्यानंतर अन्य महिलाही तक्रारीसाठी पुढे येतील. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.

तक्रारीसाठी पुढे या

पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार म्हणाले, सदर गुन्हा लोणंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेली असल्यास अन्य महिलांनीही याबाबतच्या तक्रारी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनीकेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news