महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने बरा झाल्यानंतर दिला महत्त्वाचा सल्ला ! | पुढारी

महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने बरा झाल्यानंतर दिला महत्त्वाचा सल्ला !

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना बाधित रुग्णांनी घाबरून न जाता, सकारात्मक दृष्टिकोनातून उपचार घ्यावेत. आणि आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. म्हणजे तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल, असे मनोगत महापालिकेच्या आर्ट गॅलरी कल्याण पश्चिम येथील विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज मिळालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हाय रिस्क देशातून 24 नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्याला तातडीने महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची जीनोम सिक्वेन्ससिंग चाचणी केली असता, तो ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला होता.

हा व्यक्ती महाराष्ट्रातला पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण ठरल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झाले होते. सदर रुग्णावर उपचार चालू असताना त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने, त्याच्या वाढदिवसादिनीच त्याला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला. आपल्यावर योग्य उपचार करून चांगली सेवा दिल्याबद्दल त्या रुग्णाने महापालिका आणि आरोग्य विभागाचे आभार मानले.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याने, मला 24 तास डॉक्टर उपलब्ध होते, दर दोन तासांनी माझी सर्व प्रकारची तपासणी करून काळजी घेण्यात येत होती असे सांगितले. त्याच्या वाढदिवसा दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाल्याने महापालिकेच्या आर्ट गॅलरी येथील विलगीकरण केंद्रात त्याचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान पुढील एक आठवडा त्याला गृह अलगिकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तर उर्वरित नायजेरियामधून आलेल्या त्या चार कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सींग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button