रत्नागिरी झेडपीच्या कृषी विभागाची गंडवागंडवी ! तिकीट रेल्वेचे अन्‌ प्रवास विमानाचा | पुढारी

रत्नागिरी झेडपीच्या कृषी विभागाची गंडवागंडवी ! तिकीट रेल्वेचे अन्‌ प्रवास विमानाचा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी झेडपीच्या कृषी विभागातर्फे काढण्यात आलेला शेतकरी दौरा सध्या विविध विषयांनी गाजत आहे. अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या गेलेल्या 27 जणांचे रेल्वेचे तिकीट असूनही ते विमानाने प्रवास केल्याचे पुढे आले आहे. याबाबत सोशल मीडियावर त्यांचा फोटोही व्हायरल झाले आहेत. या दौर्‍याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी होत आहे.

शेतकर्‍यांना नावीन्यपूर्ण उपक्रम तसेच शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जि. प.च्या कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्याबाहेर किंवा परजिल्ह्यात एक शेतकरी अभ्यास दौरा काढला जातो. यासाठी शासनामार्फत तरतूदही केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौर्‍यात शेतकरी कमी आणि लोकप्रतिनिधी जास्त अशी स्थिती असते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा अभ्यास दौरा काढण्यात आला नव्हता.

हा ‘शेतकरी दौरा’ सध्या मध्य प्रदेशमध्ये गेला आहे. मात्र, या शासकीय दौर्‍यात पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सदस्य, पदाधिकार्‍यांचे नातेवाईक यांचाच समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याबाबत जि.प. भवनात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता यामध्ये आणखी धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

शेतकरी चक्क विमानाने

या दौर्‍यावर एकूण 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत टेंडरही काढण्यात आले आहे. एका कंपनीने हे टेंडर घेतले आहे. त्यानुसार रेल्वे बुकींग, हॉटेल बुकींग, वाहन बुकींग यासाठी 6 लाख 46 हजार रुपये खर्च अपेक्षीत होता. नियमानुसार 70 टक्के रक्कम या कंपनीला वर्ग करण्यात आली आहे.

रेल्वेचा प्रवास असताना हे शेतकरी चक्क विमानाने गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सोशल मीडियावर फोटोही व्हायरल झाले आहेत. या दौर्‍यात 14 जि.प. सदस्य व पदाधिकारी यांचा समावेश आहे. काही पदाधिकार्‍यांचे नातेवाईक तसेच काही अधिकार्‍यांचाही यामध्ये समावेश आहे.

या दौर्‍याबाबत शेतकरी तसेच अन्य लोकप्रतिनिधींमधून नाराजी व्यक्त होत असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबत माजी खासदार नीलेश राणे तसेच भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी याबाबत आवाज उठवला आहे.

या दौर्‍यात सहभागी झालेल्यांच्या नावावर एक गुंठा तरी जमीन आहे का? निधीची कमतरता असताना गरीबांच्या पैशावर हे पदाधिकारी दौर्‍यावर गेले आहेत. उलट या पैशांचा गरीबांना फायदा झाला असता. फोटो सेशनवरून हे पिकनिकला गेल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपण आवाज उठवणार असल्याचे माजी खासादर नीलेश राणे यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button