दाऊदशी संबंधित डोला पिता, पुत्राविरुद्ध लूकआऊट नोटीस | पुढारी

दाऊदशी संबंधित डोला पिता, पुत्राविरुद्ध लूकआऊट नोटीस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, 
सांगलीतील कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याचा खास सहकारी सलीम डोला आणि त्याचा मुलगा ताहीर डोला या दोघांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. ते दोघेही सध्या तुर्की आणि दुबई येथे राहात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

एप्रिल महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या एका कारखान्यात छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी १२२ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २४५ कोटी रुपये इतकी किंमत आहे. या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी अकरा आरोपींना अटक केली आहे. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान या संपूर्ण कटात दाऊद इब्राहिम टोळीचा सहभाग उघडकीस आला होता. सलीम डोला आणि त्याचा मुलगा ताहीर डोला हे दोघेही ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सहभागी होते. या दोघांनी आतापर्यंत एक हजार कोटीहून अधिक ड्रग्जची तस्करी केल्याचे बोलले जाते.

डोला पिता-पुत्र दाऊदचे अत्यंत खास सहकारी म्हणून परिचित आहेत. सलीम हा विदेशात राहून भारतातील ड्रग्ज ऑपरेशनचे व्यवस्थापन करत होता. भारतीय एजन्सीकडून अटक होण्याच्या भीतीने दोघेही पिता-पुत्र तुर्की आणि दुबई देशात प्रवास करतात. विदेशात त्यांनी त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचे दाखविले आहे. मात्र प्रत्यक्षात सलीम हा ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे काही भक्कम पुरावे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सापडले आहेत. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यांच्या अटकेसाठी इंटरपोलची मदत घेतली जात आहे.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी अॅण्टी नाकोटिक्स सेलने सलीम डोलाच्या सांताक्रूज येथील राहत्या घरी छापा टाकला होता. यावेळी त्याच्या घरातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. नेपाळमार्गे तो दुबईला गेला.

हेही वाचा 

Back to top button