Eknath Shinde | भाजपचे २५ आमदार फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता : एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde | भाजपचे २५ आमदार फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता : एकनाथ शिंदे

विवेक गिरधारी/चंदन शिरवाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी कोणतीही खिडकी उघडलेली नाही. उद्धव ‘व्यक्तिगत’ संकटात असतील तर पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय संकटात नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाने उठवलेल्या चर्चा खाली बसवल्या. याच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. आता अशा धोकेबाज ठाकरेंशी भाजपलाच युती नको आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

लोकसभा जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप जेमतेम एकअंकी जागा देईल असे सुरुवातीचे चित्र होते. एकनाथ शिंदे तहात हरणार असेही म्हटले जाऊ लागले होते. प्रत्यक्षात शिंदे यांनी दक्षिण मुंबईसारखी सतत खुणावणारी जागा भाजपला सोडायला लावली. ठाणे, नाशिक मिळवलेच; छत्रपती संभाजीनगरदेखील भाजपकडून मिळवले. जागावाटपाचा तह जिंकल्यानंतर प्रत्यक्ष युद्धात आता या जागा राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे.

तिसर्‍या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा डागून त्या शांत करण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापूरला निघाले होते. ठाण्यातील त्यांच्या लुईस वाडी ते सांताक्रूझ विमानतळ अशा कार प्रवासात काही कळीचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी पुढारी वृत्तपत्र समूहाने साधलेला हा संवाद.

महायुतीच्या जागावाटपात भाजपने दक्षिण मुंबईसह तीन जागा तुम्हाला मुंबईत सोडल्या आणि महायुतीत भाजप खालोखाल सर्वाधिक पंधरा जागा तुम्हाला मिळाल्या. एक अंकी जागांची चर्चा असताना तुम्ही भाजपला इतके कसे पटवले?
– भाजपला पटवण्याचा प्रश्न नाही. चर्चा सुरू होत्या. दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिकवर आणि संभाजीनगरवरदेखील त्यांचा दावा होता हे खरे आहे. पण भाजपला आमचीही ताकद माहिती आहे. आम्ही या जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो याची त्यांनाही खात्री असल्याशिवाय या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागा आम्हाला सोडल्या नाहीत.
महायुतीत फक्त चार जागा घेऊन अजित पवार गटाने शहाणपण दाखवले. तुम्ही मात्र पंधरा जागांचे आव्हान पत्करले अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. तुम्हाला काय वाटते?
– आमचे खासदार असलेल्याच जागा आम्ही लढवत आहोत. हे सर्व मतदारसंघ आमचेच म्हणजे शिवसेनेचे आहेत. कोणत्याही निवडणुकीत दोन आव्हाने असतात. नव्या जागा जिंकायच्या असतात आणि जिंकलेल्या राखायच्या असतात. ही दोन्ही आव्हाने आम्ही स्वीकारली आहेत.
उमेदवारी जाहीर करण्यास
विलंब का झाला?
– 1996 पासून ठाणे लोकसभा मतदारसंघ आमच्याकडेच आहे. भाजप मित्र पक्षाला सांभाळून घेणारा पक्ष असल्यामुळे हा मतदारसंघसुद्धा आम्हालाच मिळेल अशी खात्री होती. त्यानुसार शिवसैनिक प्रचारालाही लागले होते. ठाण्यासह कल्याण, नाशिक व मुंबईमधील मतदारसंघातील निवडणुका तिसर्‍या टप्प्यात असल्यामुळे येथील जागावाटप सावकाश झाले. जागावाटपाचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेण्यात आले आहेत.
तुम्ही ज्यांना उबाठा म्हणता त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट आहे असे म्हटले जाते. तुमच्या बंडामुळे जे ठाकरेंसोबत नव्हते ते देखील ठाकरेंच्या बाजूने उभे आहेत.
– अशी कोणतीही सहानुभूतीची लाट वगैरे नाही. आपल्याला अनुकूल असा एक मतप्रवाह निर्माण केला जातो. एक परसेप्शन तयार केले जाते. त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट त्यांच्या पक्ष पदाधिकार्‍यात देखील नाही. ती असती तर त्यांचे हजारो पदाधिकारी, नेते त्यांना सोडून आमच्याकडे आले असते का ? मुंबईतच त्यांचे पन्नासएक नगरसेवक आज आमच्या मूळ शिवसेनेत आले आहेत. त्यांच्या सोबत कुणीही उरलेले नाही. जे थोडेफार आहेत ते देखील या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत राहणार नाहीत.
पण आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील उद्धव ठाकरेंबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. आदर व्यक्त केला. त्याचे काय?
– जे लोक त्यांना उठता बसता शिव्या घालतात, खालच्या पातळीवर उतरून बोलतात त्याच लोकांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी हा आदर, प्रेम, काळजी व्यक्त केली आहे. याला मनाचा मोठेपणा म्हणतात. मोदी हे जागतिक पातळीवर किती मोठे नेते आहेत! युक्रेनच्या युद्धात आपली भारतीय मुले अडकली तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी मोदींनी दोन तास युद्ध थांबवले. आज जगात अशी ताकद कुणात आहे? इतके मोठे नेतृत्व आहे मोदींचे. त्यांनी दाखवलेला मनाचा हा मोठेपणा या कद्रूंना कसा कळेल? यांना सोबत काम करणार्‍या नेत्यांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल देखील प्रेम नाही त्यांना मोदींनी व्यक्त केलेले प्रेम कळण्याचे कारण नाही. ही फार खुजी, कद्रू, अत्यंत स्वार्थी लोक आहेत.
ऐन निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम व्यक्त करून उबाठा सेनेसाठी खिडकी उघडली, बंद केलेले दार किलकिले केले असाही एक राजकीय अर्थ लावला जात आहे. याची संगती तुम्ही कशी लावता?
– आता उद्धव ठाकरेंनाच भाजपसोबत युती व्हावी असे वाटते. त्यांनी तसे प्रयत्न देखील चालवले आहेत. पण दगाबाजी करणार्‍या ठाकरेंशी युती नको असे भाजपने ठरवून टाकले आहे. त्यामुळे फट ठेवण्याचा किंवा दार किलकिले करण्याचा प्रश्न येत नाही. आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत राखण्यासाठी भाजपचे पंचवीस आमदार फोडण्याचा प्रयत्न याच उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यात त्यांना यश आले नाही. नंतर याच ठाकरेंना सोडून मग आमदारच माझ्यासोबत आले आणि आमची नैसर्गिक युती असलेल्या भाजपसोबत आम्ही आजचे सरकार स्थापन केले. भाजपने शिवसेना फोडली नाही. शिवसेनाच उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आली. यातला फरक महत्त्वाचा आहे. काहींना आपली चूक नंतर समजते. तोच प्रकार उद्धव यांच्या बाबतीत झाला. शिवसेनेने मोदी यांच्याकडे पुन्हा युतीचा प्रस्ताव दिला होता. पण कमिटमेंट मोडणार्‍यांना भाजपकडून प्रतिसाद कसा मिळणार?
उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कोणत्याही संकटात उभा राहीन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
– पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते नीट पाहा. त्यांनी व्यक्तिगत संकटात पाठीशी उभा राहीन असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही व्यक्तिगत संकटात नाहीत. ते राजकीय संकटात जरूर आहेत आणि हे संकट त्यांनी ओढवून घेतलेले आहे. उद्धव ठाकरे आजारी असतानाही मोदी यांनी त्यांना फोन केला होता. इतके त्यांचे मन मोठे आहे. मोदी म्हणाले, एक कुटुंब म्हणून मी त्यांच्या पाठी असेल. बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी जगेन. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरू शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
माझ्यासारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवणे ही मोदींना शिवसेनाप्रमुखांना वाहिलेली श्रद्धांजली वाटते. याउलट उद्धव ठाकरेंचा कारभार! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी प्रखर हिंदुत्वाच्या विचारावर युती केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी या युतीला छेद दिला. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवतो, असे सांगणार्‍यानेच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बळकावली. पण या पदावर बसून अडीच वर्षांत काहीच केले नाही. राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी आणि महाविकास आघाडीचे सरकार मजबूत करण्यासाठी भाजपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा तुम्ही उद्धव सरकारमध्ये महत्त्वाचे नेते होता आणि ठाकरेंच्या नंतर क्रमांक दोनचे मंत्री होता. भाजपचे आमदार फोडण्याबद्दल उद्धव तुमच्याशी बोलले असतीलच ना?
– उद्धव ठाकरे यांनी याबाबत माझ्यासोबत दोनवेळा चर्चाही केली. भाजपसोबत असे काही करू नये याच मताचा मी होतो. उलट राज्यात पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करावे, लोकांची आणि आमदारांचीसुद्धा भावना असल्याचे आपण उद्धव ठाकरे यांना पाच वेळा बोललो. एकदा तर त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कमिटमेंट देखील दिली. पण परत आल्यावर झाले भलतेच. महाविकास आघाडी सरकारने भाजपचे बारा आमदार निलंबित केले. यावरून उद्धव ठाकरे यांच्या पोटात काय दडले आहे, हे आम्हाला स्पष्ट झाले.
भाजप नेते गिरीश महाजन यांचे कुठले जमीन प्रकरण, आशिष शेलार यांचे महापालिकेतले काही विषय, प्रसाद लाड यांची ती कुठली कंपनी आहे तिचे काही विषय, प्रवीण दरेकरांचे मुंबई बँकेचे प्रकरण उकरून काढत या नेत्यांविरोधात कुभांड रचून त्यांना तुरुंगात टाकण्याचा महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांचा डाव होता. भाजप नेत्यांवरील कारवाईसाठी महाविकास आघाडीने वकिलांवर 80 लाख रुपये खर्च केला. हनुमानचालीसा पठण करणार्‍या अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना कोठडीत टाकले. अभिनेत्री कंगना राणावत यांच्या घरी बुलडोझर गेला. या सर्व कारवाया म्हणजे भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर भाजपचे पंचवीस आमदार फोडले जाणार होते.
आमदार फोडण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता? त्यासाठी कोण काम करत होते?
– मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच हे निर्णय घेत होते. त्यांना आपले सरकार भाजपला फोडून मजबूत करायचे होते. सरकार आघाडीचे असल्याने यात तिन्ही घटक पक्ष होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे प्रत्येकजण भाजपच्या वेगवेगळ्या आमदारांना टॅप करत होता. मी सरकारमध्ये असलो तरी आम्ही हे थांबवू शकत नव्हतो. उलट त्यांना मीदेखील नकोसाच झालो होतो. माझ्याभोवतीही सापळा रचला होता. पक्षातील नामधारी नेते आमचे खच्चीकरण करत होते. नक्षलवाद्यांपासून धोका असतानाही माझ्या सुरक्षेत कपात केली. माझ्या खात्यातही उद्धव ठाकरे लुडबुड करत होते. एका केसमध्ये मला गोवण्याचाही प्रयत्न झाला. डोक्यात सत्तेची हवा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून खासदार आणि आमदारांना मान-सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती. आमदारांना निधी देताना त्यांचे हात थरथरत होते. मंत्रालयात येऊन कारभार हाकण्याऐवजी कोरोना काळात पैसे गोळा करण्यात ते दंग झाले होते. फेसबुक लाईव्ह करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का? घरात बसून राज्याचा गाडा कधी हाकला जातो का? सारा अजब कारभार होता. शेवटी भाजपच्या बाबतीत जी चाल खेळायला गेले ती चाल यांच्यावरच उलटली आणि हे सत्ताच काय पक्ष देखील गमावून बसले.
मग तरीही तुमचा सारा प्रचार ठाकरेंभोवती का फिरतो? प्रत्येक सभेत तुमच्या भाषणात ठाकरेंचा विषय अधिक असतो.
– लोक भावनेचा आदर आणि आमदारांच्या पोलादी एकजुटीच्या बळावर आम्ही सरकार स्थापन केले. आता लोक समाधानी आहेत. अनेक विकासकामे सुरू आहेत. उद्धव सरकारच्या काळात राज्यातील अनेक चालू प्रकल्प बंद पडले. अटल सेतु, समृद्धी महामार्ग, मेट्रोसारख्या प्रकल्पाला यांनी विरोध केला. हे सर्व रखडलेले प्रकल्प आम्ही गतीने पूर्ण करत आहोत. आमच्या निर्णयांच्या जोरावर आम्ही लोकांसमोर जात आहोत. आम्ही शेतकर्‍याला एक रुपयात पीक विमा दिला आणि गेल्या खरिपात 2268 कोटी रुपयांची भरपाई वाटली. वर्षाला सहा हजार रुपये बळीराजाच्या खात्यात थेट जमा होत आहेत. सतरा लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणली जात आहे. वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणार्‍या ज्येष्ठांना आम्ही एसटी प्रवास मोफत केला. कर्नाटक सरकारने ही योजना आता उचलली. लाडक्या लेकी आमच्या लखपती होतील. गरिबांना आनंदाचा शिधा आम्ही देतो, मराठा आरक्षण शेवटी आम्हीच दिले. आज दीड लाख पदांची नोकर भरती सुरू आहे. असे असंख्य निर्णय या दोन वर्षात आम्ही घेतले. अमलात आणले. पण आमचा फोकस डायव्हर्ट करण्यासाठी आमच्यावर टीका आणि आरोप केले जात आहेत. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. आम्हाला सतत शिव्या देणार्‍यांना ते या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवतील.

Back to top button